केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार आता भारतीय सनदी सेवा परीक्षांचा दुसरा टप्पा अर्थात मुख्य परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत घेण्यात येणार आहेत.
आयएएस, आयपीएस, आयएफएस यांसह अन्य २७ सनदी सेवांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या अधिसूचनेत काही बदल करून अंतिमत: ती २६ मार्च रोजी नव्याने प्रसिद्ध करण्यात आली. नव्या अधिसूचनेनुसार अनिवार्य भाषांच्या पात्रता प्रश्नपत्रिका पूर्वीप्रमाणेच कायम करण्यात आल्या असून मुख्य परीक्षेच्या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रारूपांत मात्र बदल करण्यात आले आहेत.
नव्या बदलांच्या तसेच या बदलांमुळे उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकेल का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता, मुख्य परीक्षेसाठीचे अर्ज ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भरता येतील तसेच पूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारपासून सुरू होणारी मुख्य परीक्षा यंदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत पार पडेल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र २६ मे रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या वेळापत्रकात तसेच अभ्यासक्रमात कोणताही बदल नसल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.