Kailash Vijayvargiya on civil war: भारतातील लोकसंख्येची रचना झपाट्याने बदलत आहे. त्यानुसार पुढच्या ३० वर्षांत गृहयुद्ध पेटण्याची शक्यता आहे, असे विधान मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. विजयवर्गीय यांच्या विधानानंतर काँग्रेसने यावर टीका केली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर येथे रविवारी ‘हिंदू समाज आणि त्यांचे उत्सव’ या विषयावर बोलत असताना कैलाश विजयवर्गीय यांनी हे विधान केले.

केंद्र सरकार एकाबाजूला २०४७ पर्यंत भारत महासत्ता होणार असल्याचे सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूला विजयवर्गीय यांचे गृहयुद्धाबाबत विधान समोर येत आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये विसंगती दिसत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

हे वाचा >> Kolkata Rape Case : सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश, मुंबईतील प्रसिद्ध महिला डॉक्टरचाही फोर्समध्ये समावेश!

काय म्हणाले कैलाश विजयवर्गीय?

इंदूर येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “सामाजिक सौहार्द सध्याच्या काळात फार महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी मी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याशी बोलत होतो. हे अधिकारी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते म्हणाले की, पुढच्या ३० वर्षांनी भारतात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. भारतात लोकसंख्येचे रचना इतक्या झपाट्याने बदलत आहे की, इथे जगने कठीण होईल. आपण याचा विचार करायला हवा आणि हिंदूंना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहीजे.”

ब्रिटिशांनी फक्त एक गोष्ट केली. त्यांनी फोडा आणि राज्य करा, ही नीती अवलंबली. ब्रिटिश तर देशातून निघून गेले, पण त्यांचे प्रतिनिधित्व करणारे काही लोक इथे आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी ते फोडा आणि राज्य करा ही नीती राबवत आहेत, असाही आरोप कैलाश विजयवर्गीय यांनी केली. आज काही लोक जातीच्या नावावर लोकांना विभाजित करत आहेत. जर देशाला बळकट करायचे असेल तर समाज बळकट झाला पाहीजे. जर समाजाला बळकट करायचे असेल तर तो जातीपासून मुक्त केला पाहीजे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रवक्ते अमित चौरसिया म्हणाले की, केंद्रात मागच्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मोदींची सत्ता आहे. तर राज्यात २० वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. तरीही हिंदुत्व धोक्यात असेल तर ही चिंतेची बाब आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत मध्यप्रदेशमधील सर्वच पक्षातील नेत्यांनी भाष्य केले होते. काँग्रेसचे माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी म्हटले होते की, श्रीलंका आणि बांग्लादेशनंतर आता भारताचा क्रमांक असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे काही दिवसांनी लोक पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेने धावतील, असेही वर्मा मागच्या आठवड्यात म्हणाले होते. या विधानावर प्रतिक्रिया देत असताना विजयवर्गीय यांनी मात्र याचा निषेध केला होता. वर्मा हे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले होते.