CJI Chandrachud Angry on Lawyer for saying Yeah Yeah Yeah in court : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) न्यायालयात एका प्रकरणाची सुनाणी चालू असताना वकिलांना शिष्टाचाराचा धडा दिला. हे वकील माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करत होते. हे वकील न्यायालयात त्यांच्या याचिकेबद्दल बोलत होते. त्यानंतर सरन्यायाधीश त्यावर टिप्पणी करत असताना हे वकील सतत मान डोलावून Yeah, Yeah, Yeah (याह) म्हणत होते. त्यावर सरन्यायाधीश त्या वकिलास म्हणाले, Yeah, Yeah, Yeah म्हणण्यापेक्षा ‘Yes, Yes, Yes’ (येस) म्हणा. सरन्यायाधीशांनी ऐकवल्यानंतर त्यांनी माफी मागितली व त्यांचा मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा हे वकील बोलताना अडखळले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा Yeah चा उच्चार केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना पुन्हा एकदा Yeah ऐवजी Yes म्हणण्यास सांगितले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, “हे काही कॉफी शॉप नाही, मला तुमच्या या ‘Yeah, Yeah, Yeah’ ची अ‍ॅलर्जी आहे. न्यायालयात अशा व्यवहाराची अनुमती देता येणार नाही”. या वकिलाने २०१८ मध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात इन-हाऊस (अंतर्गत) तपास करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

सरन्यायाधीश या वकिलास म्हणाले, “न्यायमूर्ती गोगोई हे आता निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यामुळे हे न्यायालय आता अशा प्रकारच्या चौकशीचे आदेश देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली समीक्षा याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करावी लागेल. ही कलम ३२ अंतर्गत दाखल केलेली याचिका आहे का? तुम्ही प्रतिवादी म्हणून न्यायाधीशांसमोर जनहित याचिका कशी काय दाखल करू शकता?”

माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या नावावरून गोंधळ

न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “जस्टिस गोगोई हे या न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. तुम्ही एका न्यायाधीशाविरोधात अशा प्रकारची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करू शकत नाही”. त्यावर हे वकील म्हणाले, “गोगोई यांनी एका वक्तव्याच्या आधारावर माझी याचिका फेटाळली होती. त्यास मी आव्हान दिलं होतं. माझी त्यात काहीच चूक नव्हती. मी न्यायालयाला विनंती केली होती की माझी समीक्षा याचिका कामगार कायद्यांची माहिती असलेल्या खंडपीठासमोर मांडावी. परंतु, तसं झालं नाही. त्यांनी ती याचिका थेट फेटाळली”. त्यावर चंद्रचूड त्या वकिलांना म्हणाले, “तुम्ही तुमची मूळ याचिका दाखल करा. त्यातून गोगोई यांचं नाव हटवा. त्यानंतर आम्ही या याचिकेवर विचार करू”.