सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांच्यात गुरुवारी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. विकास सिंह यांनी बार असोसिएशनच्या जमीन प्रकरणाचा प्रश्न उचलला आणि हा प्रश्न यादीवर लागत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विकास सिंह यांनी हे प्रकरण सरन्यायाधीश, न्यायाधीश पीएस नरसिंहा आणि न्यायाधीश जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर उपस्थित करण्याची मागणी केली होती. मागच्या सहा महिन्यांपासून हा प्रश्न खंडपीठासमोर येत नाही आहे. मात्र विकास सिंह यांच्या मागणीवर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक केली. तुम्ही पाहताय एकही दिवस खंडपीठ मोकळं बसलं नाही, असे सांगत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
बार आणि बेंच या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश हे विकास सिंह यांच्यावर चांगलेच संतापले. विकास सिंह यांनी शांतपणे आपल्या जागेवर बसावे, असे चंद्रचूड यांनी बजावले. ते एवढ्या पुरतेच थांबले नाहीत. तर त्यांनी विकास सिंह यांना इशारा देत सांगितले, “मोठ्या आवाजात बोलायचे असेल तर माझ्या न्यायालयातून निघून जावे. हा विचार नका करु की तुमच्या भूमिकेमुळे खंडपीठ घाबरून जाईल. मी अशा पद्धतीने कुणाचाही अपमान केलेला नाही, माझ्या कारकिर्दीचे शेवटचे दोन वर्ष राहिले आहेत. याकाळात मी कुणाचाही अपमान करु इच्छित नाही.”
हे वाचा >> सुनावणी संपणार असं वाटत असतानाच हरिश साळवेंची ‘एन्ट्री’, चौकार-षटकार अन्…, नेमकं काय घडलं? वाचा…
तारीख घेण्यासाठी आपल्या घरापर्यंत येऊ का?
सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली १.३३ एकर जमीन सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनला मिळावी आणि त्या जमिनीवर वकिलांसाठी चेंबर बनविण्यात यावेत, अशी एक जुनी मागणी वकिलांची आहे. ही जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या अगदी जवळ असून न्यायालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आहे. या जमिनीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन यांच्यात खडाजंगी झाली. या प्रकरणावर तारीख मिळत नसल्याचा आक्षेप विकास सिंह यानी घेतला. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही कोणत्याही दिवशी याल तर तुमच्या प्रकरणाची सुनावणी आम्ही घ्यावा का? यावर विकास सिंह यांनी प्रश्न केला की? आता तारीख मिळवण्यासाठी आपल्या घरापर्यंत यायचे का? हे ऐकताच सरन्यायाधीशांचा पारा चढला.
१७ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, श्रीमान विकास सिंह, तुम्ही आवाज वाढवू नका. अध्यक्ष या नात्याने तुम्ही बार असोसिएशनचे नेतृत्व केले पाहीजे. मात्र तुम्ही केवळ वाद घालताय, असे मला दिसत आहे. तुम्ही अनुच्छेद ३२ अतंर्गत याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली जमीन बार असोसिएशनला मिळावी, अशी तुमची मागणी आहे. आम्ही या प्रकरणावर योग्य वेळी सुनावणी घेऊ. १७ फेब्रुवारी रोजी तुमच्या प्रकरणाची सुनावणी होईल, तसेच त्यादिवशी सुनावणी होणारं हे एकमेव प्रकरण नसेल, असेही आताच सांगतो.