CJI Chandrachud सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहलं असून त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती त्यात केली आहे. संजीव खन्ना हे आत्ताच्या काळातले सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे आपल्या पदाचा वारसा ते पुढे चालवतील अशी बाब चंद्रचूड यांनी त्यांच्या पत्रात नमूद केली आहे. केंद्र सरकारने चंद्रचूड यांची शिफारस मंजूर केली तर देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड केली जाईल. १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.

१० नोव्हेंबरला संपणार चंद्रचूड यांचा कार्यकाळ

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपतो आहे. सरन्यायाधीशच पुढे हे पद कुणाला दिलं जावं? याबाबतची शिफारस करत असतात. त्यानुसार चंद्रचूड यांनी संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी कायदा मंत्रालयालयाला पत्र लिहून पुढचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची नियुक्ती करा असं पत्र लिहिलं आहे.

कोण आहेत संजीव खन्ना?

संजीव खन्ना हे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. १९८३ मध्ये ते बार कौन्सिलचे सदस्य झाले होते. त्यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे. त्यानंतर ते दिल्ली येथील उच्च न्यायालयात आणि लवादांमध्ये काम करु लागले. संजीव खन्ना यांनी प्रदीर्घ काळ सिनियर कौन्सिल म्हणून प्राप्तीकर विभागातही काम केलं. तसंच त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीतली अनेक गुन्हेगारी प्रकरणं लढवली आहेत.

हे पण वाचा- अग्रलेख : जातीचा तुरुंग आणि तुरुंगातील जात!

२०१९ पासून सर्वोच्च न्यायलयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत

२००५ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात संजीव खन्ना यांची अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर २००६ मध्ये संजीव खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतानाच संजीव खन्ना यांनी दिल्ली ज्युडिशियल अॅकेडमीचं संचालक पदही भुषवलं आहे. १८ जानेवारी २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होण्याआधी फारच थोड्या लोकांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून केली जाते. संजीव खन्ना हे त्याच न्यायमूर्तींपैकी एक आहेत. जून २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत संजीव खन्ना यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचं कार्यकारी अध्यक्षपदही देण्यात आलं आहे. आता याच संजीव खन्ना यांची नियुक्ती सरन्यायाधीश म्हणून करण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( CJI Chandrachud ) यांनी सरकारला लिहिलं आहे. संजीव खन्ना यांचीच नियुक्ती सरन्यायाधीशपदी होईल याची चिन्हं आहेत. कारण मावळत्या सरन्यायाधीशांनी सुचवलेल्या व्यक्तीची निवडच या पदावर होत असते. ती नियुक्ती होणं ही आता एक औपचारिकता राहिली आहे.