Delhi HC Judge Yashwant Varma: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली होती. त्यानंतर वर्मा यांच्यावर विवध आरोप होत आहेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी शनिवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनु शिवरामन यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

ही समिती आपल्या चौकशीत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेली रोकड कुठून आली आणि तिचा स्त्रोत काय आहे याचा तपास करणार आहे.

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांना सध्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे कोणत्याही खटल्याचे कामकाज देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

१४ मार्च रोजीच्या आगीच्या घटनेत न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील तुघलक रस्त्यावरील निवासस्थानी बेहिशेबी रोख रकमेच्या कथित जप्तीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मिळाल्यानंतर सरन्यायाधीशांनी तीन सदस्सीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती होणार सार्वजनिक

न्यायमूर्ती यशवंत वर्मा घरी सापडलेल्या रोख रक्कम प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता या प्रकरणाशी संबंधित दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तर देखील सार्वजनिक केले जाईल. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सादर केलेला अहवाल, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे उत्तर आणि इतर कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केली जात आहेत.

न्यायपालिकेची बाजू सर्वांसमोर मांडण्यासाठी, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सर्व नोंदी सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच सर्व नोंदी सार्वजनिक होणार आहेत.

काय आहे प्रकरण?

१४ मार्च रोजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातील स्टोअर रूममध्ये आग लागली होती. त्यावेळी न्यायमूर्ती वर्मा शहरात नव्हते. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले. आग विझवल्यानंतर, पथकाने बंगल्याची तपासणी केली तेव्हा विविध खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली होती.

हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलावली आणि न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहबाद उच्च न्यायालयात बदली केली. दरम्यान न्यायाधीश यशवंत वर्मा यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.

Story img Loader