‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डस्’चे वितरण
नवी दिल्ली : धमक्यांची तमा न बाळगता सत्तेला सत्य सांगण्याचे धाडस जोपर्यंत पत्रकार करत राहतील तोपर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहू शकेल, या सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमूल्य टिप्पणीचा पुनरुच्चार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी केला. माध्यमे मुक्त राहिली तरच लोकशाही टिकेल, असे सरन्यायाधीशांनी ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डस्’ सोहळय़ात स्पष्ट केले.
कुठल्याही बाह्य दबावाला बळी न पडता निर्धारपूर्वक वृत्तांकनांतून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधणाऱ्या देशातील विविध माध्यमांतील पत्रकारांच्या या सन्मान सोहळय़ात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, ‘सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या हक्क अबाधित राखण्यावर भर दिला आहे’, अशी मार्मिक टिप्पणी करत निर्भीड पत्रकारितेची पाठराखण केली. तुम्ही पत्रकारांच्या मतांशी सहमत असालच असे नाही. पण, मतभेदाचे द्वेषात आणि द्वेषाचे हिंसेमध्ये रूपांतर होऊ नये, असे चंद्रचूड म्हणाले.
पत्रकारांच्या लोकहितवादी कर्तव्याचे कौतुक करतानाच, बनावट आणि बेजबाबदार बातम्यांमुळे होणाऱ्या भयानक परिणामांचीही जाणीव सरन्यायाधीशांनी भाषणात करून दिली. वृत्तांकनामध्ये पक्षपात आणि पूर्वग्रह घातक ठरू लागले आहेत. अशा बातम्यांमुळे लाखो लोकांची दिशाभूल होत असून, समाजामध्ये तेढ वाढत आहे. लोकांमध्ये बंधुभाव टिकण्यासाठी सत्य-असत्यातील अंतर कमी झाले पाहिजे. बातम्यांच्या पडताळणीसाठी सर्वसमावेशक तथ्य-तपासणी यंत्रणा असली पाहिजे, अशी सूचना चंद्रचूड यांनी केली.
न्यायालयाने निकाल देण्याआधीच प्रसारमाध्यमे न्यायनिवाडा करू लागली आहेत. दोषी सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण निर्दोष असतो. पण, या मूलभूत नियमालाच हरताळ फासला जात आहे. कायदेविषयक पत्रकारितेचे आकर्षण वाढले असले तरी, न्यायाधीशांच्या विधानांमधील वा निकालांमधील निवडक भाग लोकांसमोर मांडला जात आहे. त्यातून अर्थाचा अनर्थ होण्याचा धोका असतो, त्यातून लोकांमध्ये न्यायाधीशांबद्दल आणि त्यांच्या निकालांबद्दल साशंकता निर्माण होईल, अशी चिंता सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.
हक्कांच्या उल्लंघनावर प्रकाश!
करोनाच्या महासाथीमुळे जगभरात अनेकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला पाहिला. त्या काळात लोकांसमोर आ वासून उभ्या राहिलेल्या समस्यांचा, दु:खांचा, हालअपेष्टांच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून सातत्याने येत राहिल्या. करोना काळातील पत्रकारितेच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला. टाळेबंदीच्या काळात वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, समाजमाध्यमांनी लोकांपर्यंत आपापल्या राज्यातील माहिती तिथल्या रहिवाशांपर्यंत योग्यरित्या पोहोचवली. लोकांना सावध राहण्याची तसेच, प्रतिबंधात्मक उपायांची सातत्याने आठवण करून दिली. त्याचबरोबर, प्रशासकीय त्रुटी आणि अतिरेकीपणावर अचूक बोट ठेवले, असे सरन्यायाधीश म्हणाले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारेच उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने करोनाच्या काळात लोकांच्या हक्कांच्या उल्लंघनांच्या घटनांची स्वत:हून गंभीर दखल घेतली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
समाजमाध्यमांचे ‘इको चेंबर’
समाजमाध्यमांच्या ऑनलाइन व्यासपीठांमुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले हे खरेच. पूर्वी वृत्तपत्रांमधील जागेची कमतरता हा मोठा अडथळा ठरत असे. आता कदाचित वाचकांच्या संयमाची कमतरता, हा अडथळा ठरू लागला आहे. बातम्या आता यूटय़ूबवर शॉर्ट्स वा इंस्टाग्रामवर रील्सद्वारे कमीत कमी वेळेत दिल्या जात आहेत. त्यामुळे लोकांची लक्ष वेधून घेण्याची क्षमता सतत कमी होत आहे. आता काही सेकंदांच्या ‘टिटबिट्स’मधून माहिती दिली जात आहे. समाजमाध्यांनी निर्माण केलेल्या या ‘इको चेंबर’ला छेद देऊन सत्य मांडणे हे पत्रकारितेसमोरील मोठे आव्हान ठरले आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले.
डेव्हिड लो हे ‘डेव्हिड काऊ’
मला विचारले गेले की, मी कोणते वृत्तपत्र उत्सुकतेने वाचतो. उत्सुकता वृत्तपत्रापेक्षा व्यंगचित्रकारामध्ये होती. ते व्यंगचित्रकार म्हणजे आर. के. लक्ष्मण. त्यांनी व्यंगचित्रातून समाजासमोर आरसा धरण्याचे पत्रकारितेचे काम अचूकपणे केले. माझ्यासह देशातील अनेकजण आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांतील चपखल आणि विनोदी भाष्य समजून घेण्यास उत्सुक होते. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांची खिल्ली उडवली पण, त्यापैकी बहुतेकांनी त्यांनी केलेली टीका चांगल्या भावनेने स्वीकारली. त्यांच्याबद्दलचा माझा आवडता किस्सा असा की, प्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लो हे ‘डेव्हिड काऊ’ आहेत असे त्यांना वाटत होते. स्वाक्षरीच्या विशिष्ट लकबीमुळे लो यांची स्वाक्षरी काऊ अशी भासत असे!.
सरन्यायाधीश म्हणाले..
० सत्तेला सत्य सांगण्यापासून पत्रकारांना रोखले जाते तेव्हा लोकशाहीशी तडजोड केली जाते. लोकशाही टिकवायची असेल तर, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.
० लोकांसाठी गुंतागुंतीची माहिती सुलभ करण्याचा प्रयत्न पत्रकार सातत्याने करतात. पण, हे करताना अचूकतेशी तडजोड होणार याची दक्षता घेतली पाहिजे.
० प्रसारमाध्यमे वादविवाद आणि चर्चामधून सुस्त समाजाला प्रतिकार करण्याची ताकद देतात. अलीकडे अमेरिकेतील ‘मी टू’ चळवळ ही उत्तम उदाहरण म्हणता येईल. जगभर या चळवळीचा परिणाम झाला. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेसंदर्भातील अनेक घडामोडींचे प्रसारमाध्यमांनी व्यापक वृत्तांकन केले. त्यानंतर गुन्हेगारी कायद्यात सुधारणा घडून आल्या.
० देशातील वृत्तपत्रे सामाजिक-राजकीय बदलाचे उत्प्रेरक ठरली आहेत. स्वातंत्र्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्वात उपेक्षित समुदायांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी अनेक वृत्तपत्रे सुरू केली होती.
० स्थानिक पत्रकारितेने राष्ट्रीय वा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यांमधून दुर्लक्षित राहिलेल्या उपेक्षित समूहांच्या समस्यांना तोंड फोडण्याचे काम केले आहे.
पुरस्कार विजेते
हिंदी माध्यमे
* २०१९ – आनंद चौधरी –
दै. भास्कर (प्रिंट), सुशिल कुमार मोहपात्रा – एनडीटीव्ही इंडिया (ब्रॉडकास्ट)
* २०२० – ज्योती यादव व बिस्मी तस्किन – द प्रिंट (प्रिंट), आषुतोश मिश्रा – आज तक (ब्रॉडकास्ट)
प्रादेशिक भाषा
* २०१९ – अनिकेत वसंत साठे – लोकसत्ता (प्रिंट), सुनिल बेबी – मीडिया वन टीव्ही (ब्रॉडकास्ट)
* २०२० – श्रीलक्ष्मी एम., रोझ मारिया विंसेंट व शबिथा एम. के. – मरुभूमी डॉट कॉम (प्रिंट), श्रीकांत बांगले – बीबीसी न्यूज मराठी (ब्रॉडकास्ट)
पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान वार्ताकन
* २०१९ – टीम पारी – पिपल्स अचिव्ह ऑफ रुरल इंडिया (प्रिंट), टीम स्क्रोल डॉट इन (ब्रॉडकास्ट/डिजिटल)
* २०२० – मनिष मिश्रा – अमर उजाला (प्रिंट), फाय डिसोझा व अरूण रंगास्वामी – फ्रीमिडिया इंटरअॅक्टिव्ह (ब्रॉडकास्ट)
अदृष्य भारताचा शोध
* २०१९ – शिव सहाय सिंह – द हिंदू (प्रिंट), त्रिदीप के. मंडल – दिक्वट डॉट कॉम (ब्रॉडकास्ट/डिजिटल)
* २०२० – दानिश सिद्दिकी, अलसदीर पाल, देवज्योत घोषाल आणि सौरभ शर्मा – थॉम्सन रॉयटर्स (प्रिंट), संजय नंदन – एबीपी न्यूज (ब्रॉडकास्ट)
व्यापार आणि अर्थ
* २०१९ – सुमंत बॅनर्जी – बिझनेस टुडे (प्रिंट), आयुषी जिंदाल – इंडिया टुडे टीव्ही (ब्रॉडकास्ट)
* २०२० – ओंकार खांडेकर – एच.टी. मिंट (प्रिंट)
राजकारण, प्रशासन
* २०१९ – धीरज मिश्रा – द वायर (प्रिंट/डिजिटल), सीमी पाशा – द वायर डॉट इन (ब्रॉडकास्ट/डिजिटल)
* २०२० – बिपाशा मुखर्जी – इंडिया टुडे टीव्ही (ब्रॉडकास्ट)
क्रीडा पत्रकारिता
* २०१९ – निहाल कोशी – द इंडियन एक्सप्रेस (प्रिंट), टीम न्यूजएक्स (ब्रॉडकास्ट)
* २०२० – मिहिर वसवाडा – द इंडियन एक्सप्रेस (प्रिंट), अजय सिंह – एनडीटीव्ही इंडिया (ब्रॉडकास्ट)
शोधपत्रकारिता
* २०१९ – कौनेन शेरिफ एम. – द इंडियन एक्सप्रेस (प्रिंट), एस. महेश कुमार – मनोरमा न्यूज (ब्रॉडकास्ट)
* २०२० – तनुश्री पांडे – इंडिया टुडे (प्रिंट), मिलन शर्मा – इंडिया टुडे टीव्ही (ब्रॉडकास्ट)
कला, संस्कृती, मनोरंजन
* २०१९ – उदय भाटिया – एच. टी. मिंट (प्रिंट)
* २०२० – तोरा अग्रवाल – द इंडियन एक्सप्रेस (प्रिंट)
सामाजिक पत्रकारिता
* २०१९ – चैतन्य मारपकवार – मुंबई मिरर (प्रिंट)
* २०२० – शेख अतिख रशिद – द इंडियन एक्सप्रेस (प्रिंट)
छायाचित्र पत्रकारिता
* २०१९ – झिशान ए. लतिफ – द कॅरावान (प्रिंट)
* २०२० – तरुण रावत – द टाइम्स ऑफ इंडिया (प्रिंट)
पुस्तक (वास्तववादी)
* २०१९ – मिडनाईट्स मशिन्स, लेखक – अरूण मोहन सुकुमार (पेंग्विन रँडम हाऊस)
* २०२० – सिक्सटीन स्टॉर्मी डेज लेखक – त्रिपुरदमन सिंह (पेंग्विन रँडम हाऊस)
भारतातील परदेशी पत्रकार
* २०२० – जोआना स्लॅटर – द वॉशिंग्टन पोस्ट (प्रिंट)