गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. सुनावणीच्या वेळी न्यायालयात शिस्त असावी, यासाठी ते आग्रही असता. त्यामुळे सुनावणीदरम्यान विषय सोडून वायफळ बडबड करणाऱ्या वकिलांना ते अनेकदा झापतात.
शुक्रवारी न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला चांगलंच सुनावलं आहे. वकिलाच्या वागणुकीवर नाराज झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्याची मागणी फेटाळून लावली. तसेच संबंधित वकिलाला परत जाण्यास सांगितलं आणि खटला नोंदवण्यासाठी उद्या या…असंही चंद्रचूड म्हणाले.
‘बार अँड बेंच’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी एक वकील आपला खटला दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आला होता. यावेळी संबंधित वकिलाच्या वागणुकीवरून चंद्रचूड यांनी त्याला झापलं. यावेळी चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही काय करत आहात? तुमच्या समोर एक महिला उभी आहे. काहीतरी आदर राखा. तुम्ही घरात आणि घराबाहेर असंच वागता का? समोर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावरून हात टाकत तुम्ही माईक घेत आहात. आता परत जा आणि उद्या या… थोडा तरी आदर राखा…”
विशेष म्हणजे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एखाद्या वकिलाला झापण्याची ही पहिलीच वेळ नाही. न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या वकिलांना त्यांना अनेकदा सुनावलं आहे.