Supreme Court Hearing : देशभरातील विविध प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असते. या सुनावणीच्या लिस्टिंग आदल्या दिवशी निघत असतात. दिवसभराचं कामकाज ठरलेलं असल्याने तातडीच्या सुनावण्या फार कमी वेळा घेतल्या जातात. अशातच जेव्हा वकिल, “आजच सुनावणी घ्या”, म्हणून आग्रह करतात तेव्हा सरन्यायाधीशांचाही राग अनावर होतो. आजही सर्वोच्च न्यायालयात हे पाहायलं मिळालं. वकिलाकडून सुनावणीसाठी विनंती होत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांना संताप अनावर झाला.
एका याचिकेवर सुनावणी व्हावी याकरता तातडीची लिस्टिंग व्हावी अशी मागणी वकिलाने केली. परंतु, या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायाधीश सुनावणी घेतील, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. मात्र, तरीही सरन्यायाधीशांचा आदेश डावलून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकिलाने केली.
हेही वाचा >> “…तर अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान
सुनावणीसाठी वकिलाचा आग्रह पाहताच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड संतापले. “हा मार्ग नाही. मी तुम्हाला कोर्टरुममधून काढून टाकेन. आज २१२ प्रकरणे आहेत आणि आम्ही तुम्हाला सुट्टीकालीन लिस्टिंग दिलंय तरीही तुम्ही आग्रह करताय”, असं सरन्यायाधीशांनी खडसावले.
ते पुढे म्हणाले की, “आपण एक काम करू, आम्ही इथून निघून जातो. मग कामकाज पूर्ण झाल्यावर येतो.” सरन्यायाधीशांनी अशा शब्दांत राग व्यक्त केल्याने वकिलाने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली. “हीच आपली समस्या असते की आपण इतरांचं ऐकत नाहीच. आम्ही तुम्हाला सुनावणीसाठी तारीख देतोय. मी दिली नाही का?” असाही सवाल त्यांनी यावेळी विचारला.