CJI DY Chandrachud to AI Lawyer: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागाराचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कृत्रिम प्रज्ञेवर आधारित असलेल्या वकिलाशी (AI Lawyer) संवाद साधला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर एआय वकिलाने दिले. उत्तर एकताच चंद्रचूड यांच्यासह इतर उपस्थित अनेकजण अवाक झाले.

सरन्यायाधीशांनी कोणता प्रश्न विचारला?

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एआय वकिलाला प्रश्न विचारला की, भारतात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे का? यावर उत्तर देताना एआय वकिलाने सांगितले, “हो, भारतात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे. एखाद्या दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारात सर्वोच्च न्यायालय अपवादा‍त्मक परिस्थितीत अतिशय घृणास्पद गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावू शकते.”

या कार्यक्रमाला इतर न्यायाधीशही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना सरन्यायाधीश म्हणाल की, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे संग्रहालय संवादी बनवावे, असे त्यांना वाटत होते. विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला नक्कीच भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. ज्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात आले आहे, त्याठिकाणी वकिलांसाठी वाचनालय आणि कॅफे लाउंज बांधले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी मान्य होऊ शकली नाही. त्यामुळे उद्घाटनाच्या एक दिवस आधी बार असोसिएशनने कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

सरन्यायाधीश काही दिवसांतच निवृत्त

सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांचे नाव पुढील सरन्यायाधीशपदासाठी सुचविले आहे. २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकृतरित्या सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांचे नाव जाहीर केले. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील.

Story img Loader