महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी होत आहे. १६ आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे निर्णय यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होत आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावाचे एक पत्र आपल्या युक्तिवादासोबत जोडले होते. मात्र हे पत्र मराठीत असल्यामुळे त्याचे भाषांतरही जोडण्यात यावे असे न्यायाधीश कोहली यांनी सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यामध्ये हस्तक्षेप करत हे मराठीतील पत्र सर्वोच्च न्यायलयात वाचून दाखवत शिवसेना कार्यकारणीच्या ठरावच्या बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती दिली.
हे वाचा >> “वहिनींनी कळत-नकळत…”, शिवसेना फुटण्याचे कारण सांगतांना भरत गोगावले यांनी केला खळबळजनक आरोप
या पत्रातला ठराव वाचून दाखविताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, “शिवसेने भवन, दादर, मुंबई येथे शिवसेना पक्षाची नवनिर्वाचित आमदारांची बैठक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्रा राज्य विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीच्या सुरुवातीलच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्व अधिकारी अध्यक्ष म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधीमंडळातील शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आमदार श्री. एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री. सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढीलप्रमाणे आहेत.”
हे वाचा >> सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा डंका! सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड
या पत्रावरुन उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आले होते. तसेच गटनेता, प्रतोद म्हणून कुणाला अधिकार दिले आहेत, याबाबत या पत्रात उल्लेख केलेला आहे, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्राचा सार ऐकून दाखविला.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय होता?
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या ठरावांचा हवाला देऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व अधिकार होते, असे सांगितले. तसेच एकनाथ शिंदे हे पक्षात चौथ्या क्रमांकाचे नेते होते. ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. पण ती घटनाच मान्य नाही, असे निवडणूक आयोग सांगत असल्याचे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कोण आहेत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड?
डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. याआधी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड असे आहे. न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देखील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.
२०१९ सालापासून देशाला चार सरन्यायाधीश मिळाले, योगायोग असा की त्यातील तीन न्यायाधीश मराठी आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये न्या. शरद बोबडे यांनी, ऑगस्ट २०२२ मध्ये न्या. लळित यांनी तर नोव्हेंबर २०२२ मध्ये न्या. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. २०२४ सालापर्यंत न्या. चंद्रचूड सरन्यायाधीश पदावर असतील.