देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कबीराच्या दोह्याचं उदाहरण देत एक वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे. प्रयागराज या ठिकाणी राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या समारंभात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं तसंच शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत चंद्रचूड?
‘अति का भला न बोलना, अति की भली न चूप, अति का भला न बरसना, अति की भली न धूप’ हा दोहा ऐकवत डी. वाय. चंद्रचूड म्हणाले समाजातली कुणीही व्यक्ती जास्त बोलत असेल तर ते योग्य नाही त्याचप्रमाणे मी जास्त शांत राहणं, मौन बाळगणं योग्य नाही. यावेळी त्यांनी कायद्याबाबत अनेक गोष्टींचा उल्लेख केला. कायद्याचं शिक्षण घेणं हे फक्त तुमचा पेशा म्हणून स्वीकारु नका. तर एक वकील झाल्यानंतर आपल्याला नव्या विषयांची ओळख, समाजातल्या समस्या, तसंच बदल घडवून आणणं यावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातलं शिक्षणाचं क्षेत्र हे आणखी विस्तारलं पाहिजे असंही डी. वाय. चंद्रचूड म्हणाले आहेत.
हे पण वाचा- ‘ही तर लोकशाहीची हत्या’, चंदीगडच्या महापौर निवडणुकीवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले
कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये
शिक्षण दिलं जात असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. कुठलाही अभ्यासक्रम असा हवा जो विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल. अगदी इंग्रजी भाषा असेल तरीही त्यांना त्याचं दडपण यायला नको. हिंदीतून शिक्षण देण्यास प्राथमिकता दिली गेली पाहिजे. असं झालं तर अनेक प्रतिभाशाली विद्यार्थी समोर येतील. शिक्षणाच्या संधीही योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत. भाषा, प्रांत, लिंग यांच्या आधारे कुठलाही भेदभाव व्हायला नको असंही मत चंद्रचूड यांनी मांडलं आहे. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे. याच कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चंद्रचूड यांना गणेशाची मूर्तीही भेट म्हणून दिली. हा फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहे.