भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी करोनाचा ओमायक्रॉन विषाण हा सायलेंट किलर असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच दुसऱ्या लाटेत झालेल्या करोना संसर्गानंतर अनुभवलेल्या २५ दिवसांचा अनुभव सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी पूर्ण क्षमतेने प्रत्यक्ष हजर राहत सुनावणीस सुरुवात करण्याची विनंती केली. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केलं.
सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी ऑफलाईन सुनावणीची मागणी केली. यावर सरन्यायाधीश रमण यांनी दररोजच्या करोना रुग्णांची संख्या १५,००० वर पोहचल्याचं सांगितलं. यावर सिंह यांनी हा करोनाचा ओमायक्रॉन विषाणू असून तो सौम्य असल्याचं म्हटलं.
यावर सरन्यायाधीश म्हणाले, “ओमायक्रॉन सायलंट किलर आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत मला संसर्ग झाला, मात्र मी ४ दिवसांमध्ये बरा झालो. आता दुसऱ्या लाटेत मला करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला. मागील २५ दिवसांपासून मी सातत्याने त्याचे परिणाम भोगत आहे.”
सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी कशी होते?
सध्या सर्वोच्च न्यायालयात आलटून पालटून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुनावणी होते. आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी सुनावणीसाठी वकिलांना न्यायालयात हजर राहणं बंधनकारक आहे. याशिवाय सोमवार आणि शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने खटल्यांची सुनावणी होते. मंगळवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहत ऑफलाईन सुनावणी होते.