भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी तरुण असताना सक्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सूक होतो, अशी माहिती दिलीय. मात्र, नियतीला वेगळंच हवं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी गावातील एका शेतकरी कुटुंबातील जन्म ते सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश या संपूर्ण प्रवासाची माहिती श्रोत्यांना दिली. ते रविवारी (२३ जुलै) रांचीमधील झारखंड उच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा म्हणाले, “माझा जन्म एका गावात शेतकरी कुटुंबात झाला. मी सातवी/आठवीत असताना इंग्रजी विषयाशी ओळख झाली. तेव्हा दहावी उत्तीर्ण होणं हे मोठं यश होतं. बी. एससी पदवी घेतल्यानंतर माझ्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी कायद्याची पदवी घेतली. यानंतर मी विजयवाडा मॅजेस्ट्रेट कोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली.”
“माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी हैदराबादला आलो”
“विजयवाडामध्ये काही महिने वकिली केल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी हैदराबादला आलो. येथे मी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात वकिली केली. तेव्हा मला न्यायाधीश होण्याची ऑफरही मिळाली. मी तालुका स्तरापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये काम केलं. माझी माझ्या राज्याचा अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही नियुक्ती झाली,” अशी माहिती रमण्णा यांनी दिली.
“मी सक्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सुक होतो, पण…”
रमण्णा पुढे म्हणाले, “मी सक्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सुक होतो, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. ज्यासाठी खूप मेहनत घेतली ते सोडून देण्याचा निर्णय सोपा नव्हता. माझा वकिली ते न्यायाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास सहज नव्हता. मागील अनेक वर्षे मी माझं करिअर लोकांच्या अवतीभोवती निर्माण केलं. मात्र, वकिली सोडून न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतल्यास मला माझे सामाजिक आयुष्य सोडून द्यावे लागेल याची मला कल्पना होती.”
“मी न्यायाधीश म्हणून मागील अनेक वर्षे माझं आयुष्य एकांतात घालवलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“माध्यमं कंगारू कोर्ट चालवत आहेत”
रमण्णा यांनी यावेळी माध्यमेच निवाडे करू लागली आहेत असाही आरोप केला. “मुद्रित माध्यमं काही प्रमाणात जबाबदारीने वागतात, मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांची शून्य जबाबदारी आहे. सोशल मीडियाची स्थिती तर सर्वाधिक वाईट आहे. माध्यमं कंगारू कोर्ट चालवत आहेत,” असं मत सरन्यायाधीश रमण्णा यांनी नोंदवलं.