मणिपूरच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज ( ८ ऑगस्ट ) लोकसभेत चर्चा होत आहे. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शरसंधान साधलं. याला खासदार अरविंद सावंत यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाची बाजू घेत अरविद सावंत यांना इशारा दिला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार असताना सर्व कामे थांबवण्यात आली. कारण, उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नव्हते. अडीच वर्षांत अडीच दिवसच मंत्रालयात जाण्याचा विक्रम उद्धव ठाकरे यांनी केला होता. २०१९ साली भाजपा आणि शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलं होतं. पण, निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. बाळासाहेबांचे विचार विकून हिंदुत्वापासून लांब जाण्याचं काम त्यांनी केलं. १३ कोटी लोकांबरोबर गद्दारी यांनी केली.”
हेही वाचा : “…इसलिए बढाई है, मैंने अपनी दाढी”, रामदास आठवलेंच्या कवितेवर अमित शाहांना हसू आवरेना
त्यानंतर बोलताना अरविंद सावंत यांनी भाष्य करत श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं. “गोगाई यांनी मणिपूरचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ‘१९६३ आणि १९७६ साली काय झालं?’ अशी काही काही भाषणं मी ऐकली. पण, तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता,” असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केला.
“मणिपूरमध्ये हिंसाचार झाला, महिलांवर अत्याचार झाले, तरीही केंद्रातील सरकार ७० दिवस गप्प राहिले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पंतप्रधान ३६ सेकंद बोलले. पण, आता महाराष्ट्रावर मी बोलणार आहे. काहीजण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. पळपुट्यांनी हिंदुत्वांवर बोलू नये. ‘मंदिरातील घंटा वाजवणारे नाहीतर, दहशतवाद्यांना मारणारे हिंदुत्व पाहिजे,’ असं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरसभेत एनसीपीला ‘नॅशनल करप्ट पार्टी’ म्हटलं. ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले होते, तेच चार दिवसानंतर महाराष्ट्रातील सरकारमध्ये सामील झाले. महाराष्ट्रातील सरकार घटनाबाह्य आहे. करोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाचं निती आयोग, जागतिक आरोग्य संघटना, सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं,” असं अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा : संजय राऊतांचा राज्यसभेत थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल, अमित शाहांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “जरा…”
दरम्यान, सावंत यांच्या भाषणानंतर नारायण राणे बोलायला उभे राहिले. राणेंनी म्हटलं, “अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना वाटलं दिल्लीत नाही, महाराष्ट्रातील विधानसभेत बसलोय, असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर बोलताना अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हिंदुत्वाबाबत भाष्य केलं. हिंदुत्वाबाबत एवढा गर्व होता, तर २०१९ साली भाजपाशी गद्दारी करून शरद पवार यांच्याबरोबर युती का केली? तेव्हा हिंदुत्व लक्षात नाही आलं. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सावंत बोलत आहेत. मग, ते शिवसेनेत कधी आले?”
“मी १९६६ पासूनचा शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडल्यावर २२० लोकांनी संरक्षण घेतलं होतं. आता जो आवाज येतोय तो मांजराचा आहे. वाघाचा आवाज नाही आहे. पंतप्रधान मोदींवर बोलण्याची त्यांची लायकी नाही आहे. भाजपा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या बोलल्यावर तुमची लायकी दाखवून देऊ,” असा इशारा नारायण राणे यांनी दिला.