Clashes at Mhow after ICC Champions Trophy win : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या दुबई येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवरती चार गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शहरांमधून विजयी रॅली काढण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र अशाच एका विजयी रॅली दरम्यान मध्यप्रदेशातील महू येथील जामा मशिदीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काढण्यात आलेली एक रॅली महू येथील जामा मशीद परिसरातून जात असताना परिसरातील काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. ज्यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन वाहने आणि दोन दुकानेही यावेळी पेटवून देण्यात आली.
स्थानिकांनी दिलेल्या मागितीनुसार ही रॅली जाम मशिदीच्या जवळ आली असता काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लोक त्यांच्या दुचाकी टाकून पाळून गेले.
दरम्यान या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंदौर ग्रामीण आणि शहरातील मोठ्या संख्येने पोलीस दल परिसरात तैनात करण्यात आले. या घटनेनंतर महूमध्ये लष्कराचे जवान देखील तैनात करणअयात आले आहेत. मात्र शहरात लष्करी छावणी असल्याने तेथे नेहमीच लष्करी तुकड्या तैनात असतात, त्यामुळे वेगळी लष्करी तुकडी तैनात करण्याची गरज पडली नाही.
इंदौरचे जिल्हाधीकारी आशिष सिंह यांनी सांगितेल की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. “हे कसं घडलं हे नंतर पाहिलं जाईल. सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात आहे,” असे सिंह म्हणाले. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
भारतीय संघाचा दमदार विजय
भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. जडेजाने ४९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माने ७६ धावा करत सामन्याचा सामनावीर ठरला. या विजयानंतर देशभरात सेलीब्रेशन करण्यात आले. राजकीय वर्तुळातून देखील टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.