पीटीआय, कोलकाता : येत्या ८ जुलैला होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झडल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. उमेदवारी अर्ज भरण्यावरून सुरू झालेला हिंसाचार दक्षिण २४ परगणा व बांकुरा जिल्ह्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी अव्याहत सुरू राहिला.

 दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या भांगर येथे इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि तृणमूल यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना बॉम्ब फेकले आणि अनेक मोटारींची नासधूस करण्यात आली. यात दोन्ही बाजूंचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

तृणमूल काँग्रेसवर आरोप

९ जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाल्यापासून, राज्याच्या विविध भागांत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस गुंडशक्तीचा वापर करत असल्याचा आरोप भाजप, काँग्रेस व माकप यांनी केला आहे.

Story img Loader