लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तीन भाषांच्या सक्तीच्या वादानंतर, दक्षिणेतील राज्यांमध्ये घटणाऱ्या संभाव्य मतदारसंघाच्या संख्येच्या प्रकरणावरून गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये रणकंदन माजले. त्यामुळे दोन्ही सभागृहे सातत्याने तहकूब करण्यात आली. या मुद्द्यावर चेन्नईमध्ये शनिवारी, २२ मार्च रोजी ‘द्रमुक’ने महत्त्वाची बैठक आयोजित केली असून संसदेमध्ये दिवसभर झालेल्या गदारोळामुळे दक्षिणेतील मतदारसंघांच्या फेरबदलांचा मुद्दा तीव्र होऊ लागल्याचे स्पष्ट झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, दक्षिणेकडील राज्यांतील मतदारसंघांची संख्या कमी होणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी, दक्षिणेतील राज्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण असून त्याचे प्रतिबिंब गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांनी प्रामुख्याने द्रमुकच्या सदस्यांच्या निदर्शनातून व्यक्त झाले.
संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी द्रमुकच्या सदस्यांनी संसदेच्या आवारात मतदारसंघांच्या फेरबदलाला विरोध करणारे टी शर्ट घालून घोषणाबाजी केली. ‘डिलिमिटेशन: तामीळनाडू विल फाइट, तामीळनाडू विल विन’ असे या टी शर्टवर लिहिलेले होते. हेच टी शर्ट घालून ‘द्रमुक’चे सदस्य लोकसभा व राज्यसभेत गेले.
सभागृह तहकूब
लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांनी द्रमुकच्या सदस्यांना टी शर्ट घालून सभागृहात न येण्याची सूचना केली पण, त्याकडे दुर्लक्ष करत या सदस्यांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली.
घोषणा लिहिलेले टी शर्ट घालून सभागृहात येणार असाल तर सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही. तुम्ही टी शर्ट काढून या, असे निर्देश बिर्ला यांनी दिले. मात्र, द्रमुकचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने बिर्ला यांनी वीस मिनिटांमध्ये सभागृह तहकूब केले. दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी दुसऱ्यांदा तहकूब झाले. त्यानंतर सभागृह दुपारी २ पर्यंत तहकूब झाले. तिसऱ्या तहकुबीनंतर अखेर बिर्ला यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले.
राज्यसभेतही गोंधळ
राज्यसभेमध्येही द्रमुकच्या सदस्यांनी मतदारसंघांच्या फेरबदलाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्यामुळे सभापती जगदीश धनखड यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले व सभापतींच्या कक्षामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी बैठक घेतले. मात्र, या बैठकीनंतरही विरोधकांच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांनी सभागृहामध्ये घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब झाल्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.