कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील एका खासगी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीने सोमवारी कॅम्पसच्या शौचालयात बाळाला जन्म दिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीने महिलांच्या शौचालयात बाळाची प्रसूती केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलगी इयत्ता अकरावीत शिकत आहे. तिची प्रसूती झाल्यानंतर तिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुलीच्या पालकांनी कोलार महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.”
महिला समुपदेशक साधणार संवाद
“मुलगी आणि मुलगा गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मुलगी गरोदर होती. पण कुटुंबाला तिची गर्भधारणा कशी लक्षात आली नाही आणि तिने माहिती का लपवली हे अजूनही समोर आलेलं नाही. तिची नुकतीच प्रसूती झाली असल्याने आम्ही तिच्याशी महिला समुपदेशकाच्या मतदीने नंतर बोलू'”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिसांनी सांगितले की त्यांनी आयपीसीच्या भारतीय मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ६ (अग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार) आणि कलम ३७२ (२) (एन) (त्याच महिलेवर वारंवार बलात्कार करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल
नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर या प्रकरणाची नोंद झाली असली तरी, कथित गुन्हा नऊ महिन्यांपूर्वी घडला असून या प्रकरणात नवीन कायदे लागू होणार नाहीत, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.