बदलत्या काळात लहान मुलांना पाहायला मिळणाऱ्या गोष्टींचा आवाका प्रचंड आहे. इंटरनेटच्या काळात तर अगदी मोबाईलवरच्या एका क्लिकवर हव्या त्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणं किती आवश्यक आहे, याची खात्री पटवून देणाऱ्या अनेक नवनव्या घटना समोर येताना दिसत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पडीक इमारतीमध्ये नववर्षानिमित्त सहावी-सातवीची अर्थात अवघ्या ११-१२ वर्षांची मुलं बीअर पार्टी करताना आढळून आली आहेत. सुरक्षारक्षक व शाळेच्या ड्रायव्हरच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तिथे जात व्हिडीओ शूट केला आणि हा प्रकार समोर आला.
नेमकं काय घडलं?
हा सगळा प्रकार आंध्र प्रदेशच्या अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम मंडल भागात घडला. फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार ही जवळपास १६ मुलं ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी जमली होती. ही सगळी मुलं चोडावरम मंडल परिसरातील शासकीय निवासी शाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. ही मुलं शाळेत सहावी, सातवी आणि दहावीच्या वर्गात शिकत असल्याचंही समोर आलं आहे. या मुलांच्या पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो शाळेच्या ड्रायव्हरनं काढल्याचं सांगितलं जात आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये ही मुलं एका अर्धवट बांधकाम झालेल्या पडीक इमारतीमध्ये एका खोलीत बसल्याचं दिसत आहे. त्यांच्यासमोर बीअरच्या अने बाटल्या आहेत. त्यातल्या काही रिकाम्याही आहेत. ही इमारत मुलांच्या हॉस्टेलजवळच असल्याचं या वृत्तात नमूद केलं आहे. ही मुलं नववर्षाच्या स्वागतासाठी बीअर आणि त्यासोबत बिर्याणीचा आस्वाद घेत होती. नशेत धुंद झालेली मुलं नंतर तिथे आलेल्या सुरक्षारक्षक व शाळेच्या ड्रायव्हरलाही शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. या मुलांसोबत तिथे दोन अनोळखी इसमही पार्टी करत असल्याचं आढळून आलं.
इथे पाहा घटनेचा व्हायरल झालेला व्हिडीओ
ही सगळी मुलं अल्पवयीन असल्यामुळे हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. मुलांच्या पालकांनी तातडीने शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधल्याचं कळतंय. हा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत असल्यामुळे त्यांची ओळख किंवा इतर माहितीच्या बाबतीत अधिक तपशील देण्यास शाळा व्यवस्थापनाने नकार दिला आहे. मात्र, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.