Noida Schools Bomb Threat: शाळेत जायचा कंटाळा आल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याने एक अजब शक्कल लढवली. मात्र या युक्तीमुळे सदर विद्यार्थ्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेत जायचे नव्हते म्हणून त्याने सुट्टी मिळविण्यासाठी नोएडामधील चार शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. नोएडातील स्टेप बाय स्टेप, दे हेरिटेज स्कूल, ज्ञानश्री आणि मेअर स्कूल या शाळांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शाळेचा परिसर मोकळा करून तपास घेतला, मात्र सदर धमकी बोगस असल्याचे कालांतराने लक्षात आले.
पोलिसांनी शाळांमध्ये तपास करूनही काहीच हाती लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी बोगस ईमेल पाठविणाऱ्याच्या विरोधात सेक्टर १२६ मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२, ३५१ (४), ३५२ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ ड नुसार गुन्हा दाखल केला. तसेच ईमेलचा तपास केला असता नववीच्या विद्यार्थ्याने तो पाठवला असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, सदर विद्यार्थ्याने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची ओळख लपवली होती. पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला शाळेत जायचे नव्हते. म्हणून त्याने बॉम्बची खोटी धमकी ईमेलद्वारे पाठवली. पोलिसांनी आता विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून बाल न्यायालयात सादर केले आहे.
नोएडाचे पोलीस उपायुक्त राम बदन सिंह यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, बुधवारी रात्री १२.३० वाजता चार शाळांना धमकीचा ईमेल आला होता. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अग्निशामक दल, बॉम्ब स्कॉड, श्वान पथक आणि बीडीएस पथकाला चारही शाळांची तपासणी करण्यासाठी पाठवले. शाळांनीही विद्यार्थी, कर्मचारी वर्गाला बाहेर काढून सहकार्य केले. मात्र कसून तपासणी केल्यानंतरही हाती काही लागले नाही.
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने व्हीपीएन तंत्रज्ञान वापरून ईमेल पाठवला होता. लोकेशन आणि आयपी ॲड्रेस लपविण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले गेले. तसेच ईमेल पाठविण्याआधी मुलाने इंटरनेटवर बॉम्बची धमकी मिळालेल्या गतकाळातील काही बातम्या वाचल्या होत्या. जुन्या बातम्यांचा अभ्यास करून त्याने चार शाळांना धमकीचा ईमेल पाठवला.