दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सतरा वर्षांच्या मुलीवर तिच्या मित्रासह तिघाजणांनी चालत्या गाडीमध्ये बलात्कार केला. ही घटना मंगळवारी रात्री सफदरजंग एनक्लेव्ह येथे घडली.
संबंधित मुलगी साऊथ दिल्ली स्कूलमध्ये नववीला शिकत आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मित्रासोबत गाडीतून फिरण्यासाठी ती घरातून बाहेर पडली. कारमध्ये या दोघांसोबत आणखी दोन तरुण होते. हे सर्वजण तिला घेऊन सरोजिनीनगरजवळच्या दसरा मैदानावर गेले. तिथे रात्री दहाच्या सुमारास मित्राने आणि आणखी एका तरुणाने गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. तिसरा तरुण यावेळी गाडीच्या बाहेर उभा होता. बलात्कारानंतर संबंधित मुलीला तिथेच सोडून हे सर्वजण पळून गेले, अशी तक्रार संबंधित मुलीने दिली आहे.
घरी परतल्यावर मुलीने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीसांनी घटनेसाठी वापरण्यात आलेली मोटार जप्त केली असून, तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.