पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य आसामच्या नागाव जिल्ह्यात घडली आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपी ११ आणि १० वर्षांचे आहेत. तिसरा आरोपी २१ वर्षांचा आहे. ९० टक्के भाजलेल्या पीडित मुलीचा शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली असून तिसरा फरार आहे.

अल्पवयीन आरोपींनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाळेतून परतल्यानंतर मुलगी घरी एकटी होती त्यावेळी झाकिर हुसैनने तिच्यावर बलात्कार केला. दोन अल्पवयीन आरोपी नंतर तिथे आले व त्यांनी सुद्धा या कृत्यात सहभाग घेतला. त्यानंतर या तिघांनी मिळून मुलीला पेटवून दिले. जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा पीडित मुलीचे आई-वडिल कामावर होते असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीचे कुटुंबिय आणि झाकिरमध्ये वाद होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. आठवडयाभरातील जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे. मागच्याच आठवडयात एका ३५ वर्षीय महिलेवर नवऱ्यासमोर आठ जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता.

आसाममध्ये २०१६ साली सरबानंद सोनोवाल यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून आसाममध्ये महिलांवर बलात्काराचे ३००९ आणि महिलांविरोधात हिंसाचाराच्या १०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संसदीय मंत्री चंद्रा मोहन पातोवरी यांनी आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी सभागृहाला ही माहिती दिली होती.

Story img Loader