लेह : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांचे २१ दिवस सुरू असलेले उपोषण समाप्त केले. लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनेच्या सहाव्या अनुसूचीचा समावेश करावा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते.
घटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत. वांगचूक ६ मार्चपासून ‘क्लायमेट फास्ट’ (जलवायू उपवास) करत होते. शून्याहून कमी तापमानात ते करत असलेल्या उपोषणाला लडाखवासियांचा देखील मोठा पाठिंबा मिळाला. लेहची शिखर संस्था आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या संस्थांनी देखील वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हेही वाचा >>> ‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळावीत, असा पुनरुच्चार पर्यावरणवादी कार्यकर्तेय सोनम वांगचूक यांनी मंगळवारी केला. ‘मोदी रामभक्त आहेत. त्यामुळे ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या भगवान श्रीरामांच्या उक्तीचे पालन त्यांनी करावे आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने पाळावीत,’ असे वांगचूक म्हणाले. गेले २० दिवस लडाखच्या तीन लाख रहिवाशांपैकी ६० हजार जणांनी उपोषण आंदोलनात सहभाग नोंदवला, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही वांगचूक यांनी व्यक्त केली. वांगचूक यांनी जनतेला आवाहन केले की, ‘‘भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे. आपण किंगमेकर आहोत. आपण सरकारला त्यांचे मार्ग बदलण्यास भाग पाडू शकतो किंवा सरकार काम करत नसल्यास ते बदलू शकतो. म्हणूनच यावेळी राष्ट्रहितासाठी आपल्या मतपत्रिकेच्या शक्तीचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करा’’.