दुबई : भारतासाठी २०११ ते २०२० हे दशक हवामान बदलामुळे भारतासाठी अतिवृष्टीचे (पुरांचे) किंवा उष्णतेचे ठरले. या काळात हवामान बदलाचा वेग चिंताजनकरित्या वाढला. त्यामुळे भारतासाठी सर्वात उष्ण दशकाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी-२८) मंगळवारी जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सादर केलेल्या ‘२०११ ते २०२० च्या दशकातील पर्यावरणीय स्थिती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (यूएन सीओपी २८) सादर झालेल्या २०२३ च्या अंतरिम वार्षिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे, की २०२३ची सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद होईल. हवामान, जागतिक तापमानवाढ आणि जलस्रोतांवर काम करणाऱ्या ‘डब्ल्यूएमओ’ने म्हटले आहे की, वायव्य भारत, पाकिस्तान, चीन आणि अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी हे ‘अतिपावसाचे दशक’ ठरले.

हेही वाचा >>> ‘मिचौंग’ने आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडला; चक्रीवादळ कमकुवत होण्याची अपेक्षा, शेती-पशुधनाचे मोठे नुकसान

या अहवालात नमूद केले, की २०११ ते २०२० या दशकात आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत १९६१ ते १९९० च्या सरासरीपेक्षा तापमानापेक्षा सुमारे दुप्पट तापमान होते. २०११ ते २०२० या दशकात पडलेल्या दुष्काळांमुळे महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक आणि मानवी जीवनावर दुष्परिणाम घडले. भारतातच, २८ पैकी ११ राज्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे अन्न आणि पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

पाणी उपलब्धता आणि पुरवठय़ातील तफावतीमुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील हिमनद्या दरवर्षी सुमारे एक मीटरने वितळत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांच्या पाणीपुरवठय़ावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. २००१-२०१० च्या तुलनेत २०११-२०२० दरम्यान अंटाक्र्टिकच्या हिमाच्छादित भागातून ७५ टक्क्यांहून अधिक हिम वितळले आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन सखल किनारी प्रदेश-बेट आणि देशांचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात येईल.

हेही वाचा >>> तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत

महापुराची वारंवार संकटे

भारतातील जून २०१३ मध्ये अतिवृष्टीसह सर्वात गंभीर पुराची आपत्ती आली होती. पर्वतीय बर्फ वितळल्याने आणि हिमनदी तलाव फुटल्यामुळे उत्तराखंडमध्ये अतिप्रलय आणि भूस्खलनात पाच हजार ८००पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते. २०१८मध्ये केरळला पुराचा मोठा फटका बसला होता. तसेच २०१९ आणि २०२०मध्ये गेल्या २५ वर्षांत सर्वात उष्ण असलेल्या मान्सून काळात मोठा पूर आला होता.

Story img Loader