चेन्नई : देशाच्या किनारपट्टी भागांतील शहरांचे नियोजन करताना हवामान बदलांचा काटेकोरपणे विचार होणे आवश्यक असून, यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असा सूर ‘आयई थिंक : अवर सिटीज’च्या तिसऱ्या पर्वात व्यक्त करण्यात आला. आपल्याला निसर्गनिर्मित वाटणारी संकटे प्रत्यक्षात नैसर्गिक आहेत का, याचा विचार करून मानवी पद्धतींमध्ये बदल करण्याची गरजही या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा >>> “तुमच्या देशात चाललंय ते बघा”, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अहवालावर भारताचा संताप; पक्षपाताचा आरोप करत म्हणाले…

‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘ओमिदियर नेटवर्क इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आयई थिंक : अवर सिटीज’ चर्चासत्राचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. किनारपट्टीवरील शहरांचे नियोजन आणि हवामान बदलांचा त्यावर होणारा परिणाम तसेच त्यावरील उपाय या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ‘आयएनएचएएफ क्लाय मॅक्ट- चेन्नई’चे प्रकल्प प्रमुख डी. रघुनंदन, मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू, हैद्राबादच्या अर्बन लॅबचे कार्यकारी संचालक अनंत मरिंगंटी, क्लायमेट अॅक्शन इम्प्लिमेंटेशन कॅड सिटीज क्लायमेट लीडरशीपचे व्यवस्थापक सबरीश सुरेश आणि चेन्नई मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे सदस्य सचिव व सनदी अधिकारी अन्शुल मिश्रा हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे असोसिएट एडिटर उदित मिश्रा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचा >>> मोठी बातमी : मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

हवामान बदलांना तोंड देण्याबाबत विविध कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नसल्याची बाब माजी न्यायाधीश के. चंद्रू यांनी अधोरेखित केली. यासंदर्भात सामूहिक किंवा व्यवस्थात्मक प्रयत्नांपेक्षा व्यक्तिगत पातळीवर अधिक प्रयत्न केले जात असल्याचे चंद्रू म्हणाले. मोठ्या प्रमाणात होत असलेली बांधकामे, वातानुकूलित यंत्रणांचा वाढता वापर, खासगी वाहनांची वाढती संख्या यांचा हवामान बदलावर थेट परिणाम होत असल्याचे मत डी. रघुनाथन यांनी मांडले. शहरांमध्ये अतिवृष्टी आणि पूर येण्याचे वाढते प्रमाणही चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. सबरीश सुरेश यांनीही वारंवार पूर येत असल्याबद्दल सांगताना हवामान बदलामुळे पाऊस आणि तापमान यांच्यावर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. अन्शुल मिश्रा यांनी हवामान बदलाबाबत सरकारी पातळीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. हवामान बदलाचा प्रश्न जुना असला तरी आता त्यावर उत्तर शोधण्यात येत आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.