नवी दिल्ली :पर्यावरण, जागतिक तापमानवाढ, शाश्वत विकास हे विषय नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० गटाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेमध्ये प्रामुख्याने चर्चिले जाणार आहेत. बहुस्तरीय विकास बँक आणि जैवइंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांचे एकमत घडविण्याचा प्रयत्न या परिषदेच्या निमित्ताने केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसवर मर्यादित करण्यासाठी २०३० सालापर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता ११ टेरावॉटपर्यंत नेणे अपेक्षित आहे. त्यासाठी जैवइंधनाचा वापर घटविण्यावर सर्व देशांचे एकमत व्हावे, यासाठी भारत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. जगाच्या ८५ टक्के जीडीपी असलेले आणि ८० टक्के वायू उत्सर्जन करणाऱ्या जी-२० देशांमध्ये एकमत घडविण्याचा प्रयत्न शिखर परिषदेच्या निमित्ताने केला जाणार आहे. जुलैमध्ये झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली असली, तरी रूपरेषेबाबत एकमत होऊ शकले नाही. जी-२० सदस्य असलेल्या सौदी अरेबियाने जैवइंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने घटविण्यास विरोध केला आहे. जी-७ या विकसित देशांच्या राष्ट्रगटामध्ये मात्र यावर एकमत झाले आहे.

हेही वाचा >>> ‘आसियान’शी सहकार्य वृद्धीसाठी मोदी यांचा प्रस्ताव

कूटचलनावर नियंत्रणाचा प्रयत्न

कूटचलनाच्या (क्रिप्टो करन्सी) बाजारात असलेल्या अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्यासाठी एकमत घडविण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाईल. मध्यवर्ती बँका आणि सरकारांना अंधारात ठेवून माहिती महाजालावर होणाऱ्या कूटचलनाच्या व्यवहारांवर नियंत्रण आणावे, अशी भारताची भूमिका आहे. दिल्लीमध्ये परिषद होत असताना यावर एखादा ठोस निर्णय घेतला जावा, या दिशेने पावले टाकली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वागताची जबाबदारी राज्यमंत्र्यांवर

‘जी-२०’ समूहातील राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताची जबाबदारी राज्यमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान आदी राष्ट्रप्रमुखांचे शुक्रवारी सकाळपासून दिल्लीत आगमन होईल.  जर्मन चान्सलर ओलाफ शोल्झ यांचे स्वागत राज्यमंत्री भानुप्रताप सिंह करतील.   फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे स्वागत राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे स्वागत करतील.

आफ्रिकी महासंघाच्या समावेशास चीनचा पाठिंबा

बीजिंग : आफ्रिकी महासंघाचा (आफ्रिकन युनियन- एयू) जी २० गटात समावेश करण्यासाठी चीनने गुरुवारी पाठिंबा दर्शवला. या आफ्रिकी गटाचा जी २० मध्ये समावेशासाठी स्पष्टपणे पाठिंबा देणारा आपण पहिला देश होतो, असे त्याने नमूद केले, असे  चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले.

जी-२० : दोन दिवसांचा कार्यक्रम

’सर्व देशांचे नेते आणि त्यांची शिष्टमंडळे शनिवारी सकाळी ९ ते १० या वेळेत ‘भारत मंडपम’मध्ये पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तिश: सर्व नेत्यांचे स्वागत करतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता शिखर परिषदेचे पहिले सत्र, ‘वन अर्थ’ सुरू होईल. भोजन विश्रांतीनंतर द्विपक्षीय बैठका होतील. दुपारी २ वाजल्यानंतर परिषदेचे ‘कुटुंब’ हे दुसरे सत्र होईल. संमेलनस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रात्री ८ वाजता रात्रभोजनाचे आयोजन केले आहे. त्याआधी सांस्कृतिक कार्यक्रमही होईल.

’शनिवारी राष्ट्रप्रमुखांची बैठक होत सुरू असताना त्यांच्या पत्नींसाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पुसा येथील कृषि संशोधन केंद्राला त्या भेट देतील. तिथे होणाऱ्या भरड धान्यांच्या संशोधनाची माहिती त्यांना दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रप्रमुखांच्या पत्नी ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ला भेट देतील. तेथे भारतीय कलांचे प्रदर्शन त्यांना पाहता येईल. 

’रविवारी सकाळी सर्व राष्ट्रप्रमुख आणि त्यांच्या पत्नी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्यानंतर ते भारत मंडलममध्ये वृक्षारोपण करतील. त्यानंतर शिखर परिषदेचे तिसरे सत्र सुरू होईल. दोन दिवसांमध्ये तीन बैठकांचे आयोजन केले गेले असून त्यानंतर परिषदेचा समारोप होईल.

जी-२० गटामधील

देशांत वैविध्य आहे.  त्यांत सर्वात कमी उत्सर्जन करणाऱ्या भारतासारखे देश आहेत, तर सर्वाधिक उत्सर्जन करणारी अमेरिकाही आहे. शिखर परिषदेमध्ये जागतिक लक्ष्य ठेवले जाणार असेल, तर देशा-देशातील परिस्थितीचा त्यासाठी विचार केला गेला पाहिजे. – टी. जयरामन, ज्येष्ठ संशोधक (वातावरण बदल), एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change sustainable development issue in delhi g20 summit 2023 zws