बदलत्या हवामानाचा भारत-चीनला धोका
आयपीसीसीचे भाकीत; अन्नधान्याची चणचण भासणार
पीटीआय, नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल न क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संघटनेतर्फे जाहीर होणाऱ्या हवामानबदलविषयक अहवालाचा महत्त्वाचा भाग जाहीर झाला आहे. हा भाग धोरणकर्त्यांसाठी असून, त्यात मानवी जीवन, नसíगक साधने व सागरी परिसंस्था यावर विपरीत परिणाम होतील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. भारत व चीन या दोन देशांना टोकाच्या हवामानांना तोंड द्यावे लागणार आहे, त्याचबरोबर पिण्याचे पाणी व अन्नधान्याची चणचण शतकाच्या मध्यावधीत जाणवणार आहे. भारत-चीन या देशांमध्ये गव्हाच्या उत्पादनात घट होईल त्यामुळे आशिया खंडातील अन्न सुरक्षा धोक्यात येईल.
आयपीसीसीचा हा अहवाल एकूण ४९ पानांचा आहे. त्याचा सुरुवातीचा भाग गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला होता. आता धोरणकर्त्यांसाठी मार्गदर्शक म्हणून हा महत्त्वाचा भाग जपानमधील योकोहामा येथे जाहीर झाला. त्यात म्हटले आहे, की गरीब लोकांना याचा मोठा फटका बसणार असून साधनांवरही ताण येणार आहे. आयपीसीसीने जपानमध्ये योकोहामा येथे हा अहवाल जाहीर केला. अन्नधान्य तुटवडय़ामुळे कुपोषण निर्माण होईल व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, शहरी भागात पूर येणे, समुद्र पातळी ओलांडणे यासारखे परिणाम भारतात कोलकाता व मुंबई, बांगला देशात ढाका या शहरात दिसून येईल. हिमालयातील हिमनद्या आक्रसल्याने चीनमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होईल. भारत-चीन, पाकिस्तान या देशात गहू व मका यांचे उत्पादन कमी होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा