मानवाच्या कृतींमधून निर्माण होत जाणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रमाणाचे मोजमाप करून त्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था व फ्रेंच अवकाश संस्था यांच्यासह साठ देशांच्या अवकाश संस्था सहकार्य करणार आहेत. सीओपी २१ हवामान बदल परिषद गेल्या डिसेंबरमध्ये पॅरिस येथे झाली होती त्यावेळी हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्याचे ठरले होते. आता या कामात उपग्रहांची मदत माहिती गोळा करण्यासाठी घेतली जाणार आहे. उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आढावा घेता येणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक करारास २२ एप्रिल २०१६ मध्ये मान्यता मिळाली आहे असे सांगण्यात आले. या करारात जागतिक तापमानवाढीच्या अभ्यासात उपग्रहांचा वापर करण्याचे ठरले असून त्यात हवामानाच्या ५० घटकांची माहिती हवामान बदलाच्या अभ्यासासाठी गरजेची असते व त्यात सागरी जलपातळी, सागरी बर्फ, हरितगृह वायूंचे प्रमाण यांचा समावेश असतो, पण हे घटक अवकाशातून मोजता येतात असे इस्रोने म्हटले आहे. पॅरिस कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हरितगृहवायू कमी करण्याची क्षमता तपासणे गरजेचे असते व ते फक्त उपग्रहांच्या मदतीने शक्य आहे. इस्रो व सीएनईएस यांच्या संयुक्त विद्यमाने ३ एप्रिल रोजी दिल्लीत अवकाश संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या माध्यमातून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय निरीक्षण प्रणाली सुरू करण्याचे ठरले असून हा नवी दिल्ली जाहीरनामा १६ मे पासून अमलात आला आहे असे इस्रोने म्हटले आहे. उपग्रह माहितीचा समन्वय करणे हे आता महत्त्वाचे काम आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, सर्व अवकाश संस्थांनी हवामान बदलांच्या अभ्यासासाठी माहिती उपलब्ध करून समन्वित प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. इस्रोही त्याला वचनबद्ध असून भारताच्या उपग्रहांना मिळालेली पृथ्वी निरीक्षणातील माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. जॅक्सा, नासा, सीएनईएस यांचे जागतिक हवामान निरीक्षणात मोठे सहकार्य असणार आहे. सीएनईएसचे अध्यक्ष जीन वेस यांनी सांगितले की, अवकाश क्षेत्राच्या पलीकडे जाऊन सहकार्य केले जात आहे. साठ देशांच्या अवकाश संस्थांनी पृथ्वीच्या कल्याणासाठी त्यांच्या यंत्रणा, मानवी बुद्धिमत्ता व साधने उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून हवामान बदल रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात यश मिळू शकते असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate environment study from isro
Show comments