Bihar Clock Tower: सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधल्या एका ‘क्लॉक टॉवर’ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बिहार शरीफ या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या ‘क्लॉक टॉवर’ची उभारणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या क्लॉक टॉवरवरील घड्याळ चालू करण्यात आलं होतं. पण चालू झाल्यानंतर २४ तासांत ते बंदही पडलं आणि नेटिझन्सच्या टीकेचं लक्ष्य ठरलं. यावरून या ‘क्लॉक टॉवर’च्या बांधकामाच्या दर्जापासून बिहारमधील राजकारणापर्यंत नेटिझन्सनं सर्वच बाबींवर तोंडसुख घेतलं. पण खरा प्रकार नेमका आहे तरी काय?
बिहार शरीफमधील हा ‘क्लॉक टॉवर’ नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आणि त्याची चर्चा सुरू झाली. या ‘क्लॉक टॉवर’बाबत अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. त्यात पहिला दावा म्हणजे याचं उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यावरचं घड्याळ बंद पडलं. दुसरा दावा म्हणजे या ‘क्लॉक टॉवर’चं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं आहे. तिसरा दावा म्हणजे या टॉवरच्या बांधकामासाठी २० लाखांचा खर्च सांगण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
‘क्लॉक टॉवर’चं सत्य काय?
बिहार शरीफ महानगर पालिकेचे आयुक्त दीपक कुमार मिश्रा यांनी यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. या टॉवरचं सध्या दिसत असलेलं बांधकाम हे अंतिम नसल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच, टॉवरच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाबाबतचे दावेही त्यांनी फेटाळून लावले. अद्याप या टॉवरचं उद्घाटनही झालेलं नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
“या ‘क्लॉक टॉवर’चं अद्याप उद्घाटन करण्यात आलेलं नसून त्याचं बांधकाम अजून चालू आहे. प्रगती यात्रेदरम्यान या टॉवरवरचं घड्याळ काही काळासाठी चालू करण्यात आलं होतं. पण काही दिवसांत अज्ञात व्यक्तीने या घड्याळाच्या वायरिंगची चोरी केली. त्यामुळे ते बंद पडलं. हे वायरिंग पुन्हा करावं लागणार आहे”, असं मिश्रा म्हणाले.
‘क्लॉक टॉवर’साठी ४० नव्हे, २० लाख खर्च!
“या टॉवरचं बांधकाम अजून पूर्णही झालेलं नाही. हे काही फायनल डिझाईन नाही. तसेच, या टॉवरच्या बांधकामासाठी ४० लाख रुपये खर्च आल्याचं सांगितलं जात आहे. पण तो २० लाख रुपये खर्च आहे. हा ‘क्लॉक टॉवर’ म्हणजे नाला रोड प्रकल्पाचा एक भाग आहे. हा रस्ता पुढे मझली मंडील ते मुघल कुआँ भागाला जोडेल. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू झालं. इथलं अतिक्रमणही हटवण्यात आलं. आधी आम्ही याचं मार्च महिन्यात उद्घाटन करणार होतो. पण अतिक्रमणं हटवण्यासाठी वेळ गेल्याने त्याचं उद्घाटन मे महिन्यात होणार आहे”, असं पालिका आयुक्तांनी नमूद केलं.