हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील बंद करण्यात आलेल्या दहावीपर्यंतच्या उच्च माध्यमिक शाळा सोमवारी पुन्हा सुरू होत असताना, शांतता व सामान्य परिस्थिती पुन्हा बहाल होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी व्यक्त केला.
कनिष्ठ महाविद्यालयीन आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल, असेही म्हणाले.
‘दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या उच्च माध्यमिक शाळा उद्या सुरू होतील. सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी महत्त्वाच्या शाळांमध्ये पालक व शिक्षक यांच्या सहभागाने शांतता बैठका आयोजित करण्यास उपायुक्त, पोलीस अधीक्षक व सर्व जिल्ह्यांच्या उपसंचालकांना सांगण्यात आले आहे. शाळा शांततेने सुरू राहतील असा मला विश्वास आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
हिजाबवरून उद्भवलेल्या वादामागे काही संस्था आणि परदेशी शक्तींचा हात असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांतील अशा वृत्तांची आमचे तपास अधिकारी नोंद घेत आहेत. विद्यार्थ्यांनी शांततामय व सौहार्दाच्या वातावरणात अभ्यास करून मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांची तयारी करावी याला आमचे प्राधान्य आहे.’
उडुपी जिल्ह्यात जमावबंदी
उडुपी जिल्हा प्रसासनाने जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या परिसरात सोमवारपासून १९ फेब्रुवारीपर्यंत फौजदारी प्रक्रियासंहितेचे कलम १४४ लागू केले आहे. हिजाब- भगवे शेले वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुटी जाहीर केल्यानंतर शाळा सोमवारपासून सुरू होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा आदेश १४ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेपासून १९ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अमलात राहील.