Sudiksha Konanki Missing News: अमेरिकेत शिकणारी भारतीय वंशाची २० वर्षीय विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी ही ६ मार्च रोजी डोमिनिकन रिपब्लिक येथील समुद्रकिनाऱ्यावरून अचानक बेपत्ता झाली. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, समुद्रकिनाऱ्यावरील एका लाउंज चेअरवर कपडे आढळून आले आहेत. हे सुदीक्षाचेच कपडे असल्याचे बोलले जात आहे.

सीडीएनने कपड्यांचे फोटो समोर आणले आहेत. ज्यात पांढऱ्या रंगातील जाळीच्या डिझाइनचा सारोंग (कमरेला गुंडळाले जाणारे कापड) दिसत आहे. तसेच जवळच वाळूत झाकलेले फ्लिप-फ्लॉप (चप्पल) आढळून आले आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, सुदीक्षाने समुद्रातील पाण्यात जाण्यापूर्वी तिचे कपडे आणि चपला आरामखुर्चीजवळ सोडल्या असाव्यात.

तथापि, या कपड्यांशी छेडछाड केल्याचा कुठलाही पुरावा तपास यंत्रणेना आढळून आलेला नाही. समुद्रात पोहण्यासाठी गेल्यानंतर तिचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पिट्सबर्ग विद्यापीठाची विद्यार्थीनी असलेली सुदीक्षा कोनांकी (वय २०) ही ६ मार्च रोजी पहाटे ५.५० वाजता पुंता काना येथील एका उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये शेवटची दिसली होती. याच दिवशी पहाटे ४.१५ वाजता सुदीक्षा तिचा मित्र जोश रिबेबरोबर हातात हात घालून चालताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. यावेळी तिने परिधान केलेले कपडे आणि आता पोलिसांना समुद्रकिनारी आढळून आलेले कपडे एकसारखेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुट्ट्यांसाठी ती कॅरेबियन बेटांवर ३ मार्च रोजी आली होती.

सुदीक्षाचा मित्र जोश रिबे याला संशयित मानले जात नसले तरी त्यावर निगरानी ठेवण्यात आली आहे. सुदीक्षा समुद्रात बुडण्याची शक्यता वर्तवताना तिच्याबरोबर काहीतरी चुकीचे झाले असल्याचाही पोलिसांना संशय आहे. तर सुदीक्षाच्या कुटुंबियांनी तिचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यादृष्टीने तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

सुदीक्षा कोनांकी कोण आहे?

सीएनएनच्या वृत्तानुसार, सुदीक्षा कोनांकीचे कुटुंब मूळचे भारतातील आहे. २००६ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर ते परदेशात स्थायिक झाले. डोमिनिकन रिपब्लिक येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीक्षा ही पीट्सबर्ग विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते. याआधी ती थॉमस जेफरसन सायन्स टेक्नॉ़लॉजी या महाविद्यालयात शिक्षण घेत होती.