हिमाचल प्रदेशातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून लाहौल आणि स्पिती जिल्ह्य़ांत झालेल्या ढगफुटीत २२० हून अधिक शेळ्यामेंढय़ा, जनावरांच्या तीन छावण्या, पाच पवनचक्क्या आणि एक महत्त्वाचा पूल वाहून गेल्याचे वृत्त हाती आले आहे. तथापि, या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.
चुंगत गावात ढगफुटी झाल्याने तेथील एक महत्त्वाचा पूल वाहून गेला असून त्यामुळे शुफतो, खंजर, थिंगरथ, उदघोत आणि शालिनी या गावांशी असलेल्या रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. गुरांचा कळप पुलावरून जात असताना अचानक पुराचे पाणी आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त कळताच कार्यकारी अभियंते, महसूल अधिकारी आणि मदतकार्य पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बाधित कुटुंबाना अंतरिम मदत देण्यात आली आहे. कांग्रा, मंडी, सिरमौर आणि सिमला जिल्ह्य़ाच्या काही भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून त्यामुळे दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Story img Loader