Jammu Kashmir Cloud Burst : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तसेच वारा आणि गारपीट झाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. तसेच ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सांगितली जात आहे.
रामबन जिल्ह्यात ढगफुटी आणि अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या परिस्थितीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, काही दुकानं आणि काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. रामबनच्या उपायुक्तांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधनाना सांगितलं की रात्री १.१० वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारपर्यंत सुरूच होता.
हवामान खात्याने आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच जिल्हा प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेक भागात या संदर्भातील परिस्थितीबद्दल सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या होत्या. दरम्यान, उपायुक्त कार्यालयाने स्थापन केलेल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी महसूल आणि पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तसेच रामबन शहराच्या बाहेरील एका गावात घराच्या ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले आहेत. त्यांचे मृतदेह प्रशासनाने बाहेर काढल्याची माहिती उपायुक्तांनी सांगितली आहे. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची टीम अडचणीत असलेल्या लोकांना अद्यापही मदत करण्यासाठी काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
#WATCH | J&K | Several buildings and vehicles are damaged due to a landslide following heavy rains and hailstorm in Ramban district pic.twitter.com/3uFD5GLvRg
— ANI (@ANI) April 20, 2025
रामबन जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू आणि श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. श्रीनगरला जाणारी विमान वाहतूकही विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. ढगफुटीमुळे अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो वाहनेही चिखलात अडकली आहेत. तसेच अद्यापही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता हवामानात बदल झाल्यानंतर पाऊस पडण्याचा बंद झाल्यानंतर मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.