नवी दिल्ली : दिल्ली सरकारने राबवलेल्या शैक्षणिक धोरणाचा जगभरात डंका वाजवला जातो. त्यात आता दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्चुअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेत कोणीही प्रवेश घेऊ शकतो. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या शाळेच्या माध्यमातून जेईई-एनईईटीसाठी विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, या व्हर्चुअल शाळेमध्ये ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. आजपासून शाळेच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात. व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे.
करोनादरम्यान व्हर्चुअल शाळेच्या माध्यमातून अभ्यास सुरु होता. त्यातून प्रेरणा घेऊन व्हर्चुअल शाळा सुरु करण्यात आली. अनेक मुले अशी आहेत त्यांना काही कारणास्तव शाळेत जाता येत नाही. त्यांच्यासाठी ही शाळा वरदान ठरणार आहे. शाळेचे सर्व वर्ग ऑनलाइन असतील. या शाळेला ‘दिल्ली मॉडेल व्हर्चुअल स्कूल’ असे नाव देण्यात आल्याची माहिती, अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.