महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना लॉकडाऊन लावावा की कठोर निर्बंध लादावेत, याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र, दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये करोनाची चौथी लाट येऊन देखील, लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता वाढू लागली होती. तसेच, पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय, अशी भिती देखील दिल्लीकरांना वाटू लागली होती. मात्र, दिल्लीत लॉकडाऊन लागू करणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

 

“हात जोडून विनंती करतो”

पुन्हा लॉकडाऊन जरी लागू केला जात नसला, तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना कळकळीचं आवाहन केलं आहे. “माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की कृपया त्यांनी मास्क घालावेत”, असं केजरीवाल म्हणाले आहेत. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये दिवसभरात ३ हजार ५९४ नवे करोनाबाधित सापडले असून १४ रुग्णांचा Covid 19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता ६ लाख ६८ हजार ८१४ इतका झाला आहे.

वाढत्या रुग्णसंख्येची मुख्यमंत्र्यांना चिंता

दरम्यान, दिल्लीमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांना यावेळी नमूद केलं. “दिल्लीमध्ये सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पण सध्याची करोनाची लाट ही याआधीच्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची आहे. ऑक्टोबर २०२०पेक्षा सध्या आयसीयूमध्ये कमी रुग्ण आहेत. तेव्हा दिवसाला ४० मृत्यूंची नोंद होत होती, आता तो आकडा १० पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याऐवजी सरकार रुग्णालयांमधील आरोग्यसुविधा अधिक वाढवण्यावर आणि सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर आहे”, असं देखील केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

 

सगळ्यांना लसीकरण करण्याची परवानगी द्यावी!

सर्वच वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी केजरीवाल यांनी केली आहे. “जर मंजुरी देण्यात आलेल्या व्हॅक्सिन सुरक्षित असतील आणि केंद्र सरकारने सगळ्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिली, तर आम्ही युद्धपातळीवर दिल्लीत हजारो लसीकरण केंद्र उभारू शकतो. करोना नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होईल”, असं देखील केजरीवाल यांनी नमूद केलं आहे.

पुण्यात सात दिवसांचा मिनी लॉकडाउन : काय सुरु? काय बंद?; जाणून घ्या…

Story img Loader