नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यपदासाठीच्या निवडणुकीबाबतीतील हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन अर्ज दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होणार आहे. अध्यपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही. त्यात आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे. मात्र, अद्याप ते मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत नसल्याची माहिती मिळत आहे.

अशोक गेहलोत यांच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( २६ सप्टेंबर ) रोजी गेहलोत आपला अर्ज दाखल करू शकतात. राहुल गांधींची सुद्धा गेहलोत यांच्या नावाला पसंती आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यापूर्वी गेहलोत राहुल गांधी यांना निवडणूक लढण्याबाबत तयार करण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

शशी थरुर निवडणूक लढणार?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी मायदेशी परतल्या आहेत. त्यानंतर अध्यक्ष निवडीसंदर्भात सल्ला मसलतींना वेग आला आहे. पक्षाताली बंडखोर जी-२३ गटातील नेते, खासदार शशी थरुर यांच्यासह काही नेत्यांनी सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. सहमतीने अध्यक्ष निवडीसाठी प्रयत्न केले जात असले तरी, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत थरूर यांनी दिले आहेत. पण, अद्याप त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली नाही.

Story img Loader