सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. बोम्मई यांच्या याच विधानानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. याच कारणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाच बोम्मई यांनी या प्रश्नावरील चर्चेसाठी दिल्लीकडे धाव घेतली आहे. ते दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. तसेच सीमाप्रश्नावर ते अॅड. मुकूल रोहतगी यांच्या बातचीत करणार आहेत.
“आज मी दिल्ली दिल्लीला जात आहे. येथे मी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहे. त्यांनी मला भेटीसाठी अद्याप वेळ दिलेली नाही. मात्र आमची भेट होईल, याची मला खात्री आहे. या भेटीनंतर मी मुकूल रोहतगी यांनादेखील भेटणार आहे. या भेटीत मी त्यांच्याशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चा करणार आहे,” असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?
बेळगावमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार-चंद्रकांत पाटील
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सीमा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगावमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>>
दरम्यान, कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या वादामुळे दोन्ही राज्यांना जोडणारी एसटी सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. बोम्मई यांच्या विधानाच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बोम्माई यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. त्यांनी बस स्थानकात जाऊन आंदोलन केले होते. यामुळे कर्नाटक -महाराष्ट्र दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक सेवा बंद झाली होती.