CM Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंबाबत काही दिवसांपूर्वी मोठी चर्चा रंगली होती, त्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यातच काही दिवसांपूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला होता, या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीच्या या ठरावाबाबत मोठी चर्चा रंगली होती.
यानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी’, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी तिरुपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान समितीला काही महत्वाच्या सूचना केल्या. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, “इतर धर्माचे लोक जर अजूनही मंदिरात काम करत असतील तर त्यांना आदरपूर्वक इतर ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे. तिरुमला मंदिरात फक्त हिंदूंना कामावर ठेवायला पाहिजे. जर दुसऱ्या धर्माचे लोक सध्या तिथे काम करत असतील तर त्यांच्या भावना न दुखावता त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली पाहिजे”, असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या एका निर्णयालाही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्थगिती दिल्याचं सांगितलं. एमआरकेआर आणि मुमताज बिल्डर्सच्या हॉटेल डेव्हलपर्सना तिरुपतीमधील ३५ एकर जमीन देण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केला. हा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात झाला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला निर्णय चर्चेत
तिरुमला तिरुपती मंदिर समितीने १८ हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय चर्चेत आला होता. काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडूंनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं होतं.