गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय वारसदाराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून येईल, असं विधान केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यात भाजपामध्ये ७५व्या वर्षी निवृत्तीचा नियम असल्याचाही दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या निवृत्तीची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
ब्लूमबर्गतर्फे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट २५’ या चर्चासत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील राज्याचा हिस्सा आणि मुंबई महानगर विकास नियोजनासंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केलं. दावोसमध्ये महाराष्ट्रानं केलेल्या करारांपैकी ८० टक्के करार हे अंमलात आल्याचंही ते म्हणाले.
मोदींचे राजकीय वारसदार कोण?
दरम्यान, मुलाखतीच्या शेवटी देवेंद्र फडणवीसांना गेल्या आठवड्यात त्यांनी मोदींच्या राजकीय वारसदारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराची आठवण करून देण्यात आली. याबाबत त्यांची नेमकी भूमिका काय? अशी विचारणा केली असता फडणवीसांनी मोदींच्या राजकीय वारसदाराच्या चर्चेवर पडदा टाकला. २०२९ मध्ये मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असं फडणवीस म्हणाले.
“मी तेव्हा म्हणालो की आत्ता नरेंद्र मोदींच्या वारसदाराबाबत विचार करण्याची योग्य वेळ नाही. कारण २०२९ मध्ये पुन्हा एकदा मोदीच देशाचे पंतप्रधान होतील”, असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीच २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे आत्ताच जवळपास स्पष्ट करण्यात आलं आहे.
LIVE | Interaction at 'IGF Mumbai NXT 25: Leading the Leap'
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2025
? 11.07am | 8-4-2025?BKC, Mumbai.@IGFupdates#Maharashtra #IGFMumbai #NXT25 https://t.co/OowaJDyFbe
कशी झाली मोदींच्या वारसदाराची चर्चा सुरू?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच मोदींचं वय आणि भाजपाचा नियम या गोष्टींचा हवाला देऊन ते फार काळ पंतप्रधानपदी राहणार नाहीत, अशी शक्यता विरोधकांकडून व्यक्त केली जाऊ लागली होती. मोदींचं वय आता ७५ असून २०२९ च्या निवडणुकीवेळी ते ७८ वर्षांचे असतील. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते. त्यामुळे या नियमानुसार मोदीही निवृत्त होऊन नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती.
देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी टीकात्मक भाष्य केलं होतं. “सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही”, असं फडणवीस म्हणाले होते.