मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे इतर आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांसह भाजपाचेही नेतेही आहेत. अयोध्येत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रभू रामचंद्रांची आरती केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीकास्र सोडलं.
हिंदुत्व जर सगळ्यांच्या घरात पोहोचलं तर त्यांचं कायमस्वरुपी दुकान बंद होईल, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. दरम्यान, त्यांनी विदेश दौऱ्यात राहुल गांधींनी भारतीय लोकशाहीबद्दल केलेल्या विधानावरुनही टीका केली. काही लोक मुद्दाम आणि जाणीवपूर्वक पद्धतीने परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हा एकप्रकारे देशद्रोह आहे, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं. ते अयोध्येतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- “आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग…”, श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले, VIDEO व्हायरल
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोकांना सावरकरांचा अपमान करण्याबरोबर हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हिंदुत्व जर सगळ्यांच्या घराघरांत पोहोचलं तर त्यांचं (राहुल गांधी) कायमस्वरुपी दुकान बंद होईल. त्यांचं दुकान बंद होणारच आहे. कारण त्यांचा आकडा आता ४०० वरून ४० वर आला. त्यांनी मोदींवर आरोप केले. मोदींवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले, त्यांची परिस्थिती काय झाली आहे? हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. काही लोक बाहेरच्या देशात जाऊन मुद्दाम आणि जाणीवपूर्वक आपल्या देशाची बदनामी करत आहेत. हा खऱ्या अर्थाने एकप्रकारचा देशद्रोह आहे.”