शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकासआघाडी कोसळून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यानंतर राज्यासह देशभरात एकनाथ शिंदे यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. मात्र, त्यांचे चाहते राज्य आणि देशातच नाही, तर परदेशातही आहेत. याचाच अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आला. ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस आहे. त्याच्या एक दिवस आधीच सातासमुद्रापार अमेरिकेत जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये काही तरुणांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारा बॅनर हातात घेतला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या काही मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यात अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन या तरूणांचा समावेश आहे. हे सर्व कामानिमित्त न्यू यॉर्क येथे आहेत. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त टाईम्स स्क्वेअर येथे जाऊन केक कापला आणि हा दिवस साजरा केला.

एकनाथ शिंदेंबद्दल आपली भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अत्यंत कमी वेळात धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात एकनाथ शिंदे यांनी आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस न्यू यॉर्क येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : “मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि…”, एकनाथ शिंदेंचं वरळीत वक्तव्य

इतकंच नाही तर या तरुणांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार केला आणि तो टाईम्स क्वेअर आणि ग्रॅन्ड सेंट्रल येथे झळकवाला. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट देण्यासाठी हा वाढदिवस साजरा केल्याचं या तरूणांनी सांगितलं.

Story img Loader