येथे सुरू असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवार, ५ एप्रिल रोजी होणार आहे. समारोप सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस भाषणाची सुरुवात ‘पंजाबी’तून करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ज्या राज्यात एखादा मोठा कार्यक्रम किंवा संमेलन होत असेल त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेत सुरुवातीची काही वाक्ये मान्यवर वक्ते बोलतात. एखाद्या राजकीय निवडणूक प्रचार सभेतही तसे केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही महाराष्ट्रात आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली होती.
साहित्य संमेलन पंजाब येथे होत असल्याने, तसेच पंजाब राज्य शासनाचाही यात सक्रिय सहभाग असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात ‘पंजाबी’तून करावी, असा एक प्रयत्न आहे. त्यामुळे भाषणातील काही वाक्ये फडणवीस पंजाबी भाषेतून बोलतील, असे समजते.
फडणवीस यांनी पदग्रहण केल्यानंतर महाराष्ट्रासाठी त्यांनी आखलेल्या योजना, उपक्रम, तसेच त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल याची ‘पंजाबी’ भाषेत एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशनही समारोप सोहळ्यात केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य शासनाच्या नवी दिल्ली येथील माहिती केंद्रातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी अशा चार भाषांमध्ये प्रसिद्धीपत्रक तयार केले जाणार आहे. उद्घाटन व समारोप सोहळ्यासह संमेलनातील तीन दिवसांतील अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या बातम्याही या चार भाषांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील हिंदी व इंग्रजी प्रसारमाध्यमांना देण्यात येणार असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.
संमेलन सुरक्षेचे मराठी कवच!
घुमान येथे ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होणार आहे तो संमेलन परिसर, व्यासपीठ आणि परिसरातील सुरक्षेची सर्व जबाबदारी केतन पाटील या मराठी अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.
पाटील हे २०१० च्या भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. सध्या ते अमृतसर पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणून काम करीत आहेत. संमेलनाच्या निमित्ताने ही विशेष जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. तीन पोलीस उपअधीक्षक, सहा पोलीस निरीक्षक आणि १००-१५० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा ताफा संमेलनस्थळ आणि आसपासच्या परिसराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा