आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. यापुढे राज्यात आधार कार्ड काढण्यासाठी एनआरसी नोंदणीची रिसीप्ट आवश्यक असेल, ते म्हणाले. राज्यात आधार कार्डसाठी आलेले अर्ज लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याने हा निर्मण घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा?
मुख्यमंत्री हिमंती बिस्वा सरमा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आधार कार्डसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाची घोषणा केली. राज्यात आधार कार्डसाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ बांगलादेशमधून भारतात घुसखोरी केलेले काही नागरिकही आधार कार्डसाठी अर्ज करत आहेत. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून यापुढे आधार कार्डसाठी २०१५ मध्ये करण्यात आलेल्या एनआरसी नोंदणीची रिसीप्ट बंधनकारक असेल,अशी माहिती त्यांनी दिली.
आता आसाममध्ये आधार कार्ड काढणं कठीण
पुढे बोलताना, एनआरसी यादीत तुमचं नाव आहे की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्ही जर २०१५ मध्ये अर्जच केला नसेल, तर याचा अर्थ तुम्ही आसामचे नागरिक नसून तुम्ही राज्यात २०१४ नंतर प्रवेश केला. यापुढे आता आसाममध्ये आधार कार्ड काढणं सोप्पी नसेल. १ ऑक्टोबरपासून यासाठी कठोर नियम लागू केले जातील, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री सरमा यांनी दिली.
त्या ९.५५ लाख अर्जदारांना मिळेल बिना रिसीप्ट आधार कार्ड
दरम्यान, ज्या नागरिकांनी आधीच अर्ज केला आहे आणि ज्याचे बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत, त्यांना ही एनआरसी रिसीप्ट जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यांना त्यांचे आधार कार्ड घरपोच मिळेल, असंही मुख्यमंत्री हिमंती बिस्वा सरमा यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा अर्जदारांची संख्या एकूण ९.५५ लाख आहे.