Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (२७ ऑगस्ट) विधानसभेत मुस्लिम समुदायांबाबत बोलताना एक वादग्रस्त विधान केलं. “मियाँ मुस्लिमां”ना आसामचा ताबा घेऊ देणार नाही”, असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. ते विधानसभेत नागाव येथील एका १४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसंदर्भात बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
आसामच्या विधानसभेत विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी सभागृहात झालेल्या चर्चांवर आणि विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी असंही म्हटलं की, “लोकसंख्येची झालेली वाढ जर नियंत्रणात ठेवली असती तर आज गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं नसतं.” दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानामुळे आसामचं राजकारण तापलं आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. तसेच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला. यावर बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं की, “हो मी पक्षपातीपणा करतो. तु्म्ही काय करू शकता? लोअर आसामचे लोक वरच्या आसाममध्ये का जातील? म्हणजे मियाँ मुस्लिमांनी आसाम काबीज केला? हे आम्ही होऊ देणार नाही.”
मैं आलोचना का स्वागत करता हूँ, लेकिन हमारी पुलिस Tear Gas का प्रयोग नहीं करती।
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 27, 2024
मैं इस्लाम धर्म का विरोधी नहीं हूँ, लेकिन यदि हिंदुओं की जमीन छीनी जा रही है और बच्चियों पर अत्याचार हो रहा है, तो मैं चुप नहीं रहूँगा। और मैं जानता हूँ कि इसके लिए मुझे जान का भी खतरा हो सकता है। pic.twitter.com/CNqpnYyWXs
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच दोन्ही पक्षाचे आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ आल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काहीवेळासाठी तहकूब करावं लागलं. यानंतर आसाममध्ये विधानसभा परिसरासह राजधानी गुवाहाटीच्या अनेक भागात विरोधी पक्षांनी निदर्शने केलं. काँग्रेसच्या आमदारांनी मोर्चा काढला. यावेळी आमदारांनी हातात फलक घेऊन महिलांच्या सुरक्षेची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आसाममधील सत्ताधारी भाजपा सरकार महिलांचे संरक्षण करण्यात आणि त्यांच्यावरील गुन्हे रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे विधान केलं होतं. राज्यातील मुस्लिम लोकसंख्येबाबत बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “१० वर्षांनी सुमारे ३० टक्क्यांनी वाढत आहेत आणि २०४१ पर्यंत ते बहुसंख्य होतील”, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.