लोकसभेतील संख्याबळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशापाठोपाठ देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांशी सोमवारी अ. भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दीर्घ चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, हे पक्ष कार्यकर्त्यांकडे बघून वाटत नाही, अशी भावना काही सदस्यांनी या वेळी व्यक्त केली. पण लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील पक्ष संघटनेविषयी सडेतोडपणे बोलण्याचे धाडस काँग्रेसचे खासदार दाखवू शकले नाहीत.
राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत महाराष्ट्राच्या सर्व काँग्रेस खासदारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी बहुतांश खासदारांचा सूर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात होता. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारवादी कार्यक्रमाचा काँग्रेसजनांना त्रास सहन करावा लागत असताना राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री आहे, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पाहून वाटत नसल्याचे मत काही खासदारांनी व्यक्त केल्याचे समजते. महाराष्ट्रात सात ते आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा काँग्रेस समित्याच अस्तित्वात नाहीत. इतर काही जिल्ह्यांतील काँग्रेस समित्यांचे काम ठप्प झालेले आहे. मुंबई काँग्रेसला वर्षभरापासून अध्यक्ष लाभलेला नाही, याकडे राहुल गांधींचे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खोळंबलेली रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री सी. पी. जोशी कोणतेही सहकार्य करीत नसल्याने त्यांच्याविषयी काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधींशी बोलावे, अशी बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी सुचविले होते. पण राहुल गांधी यांच्या खास मर्जीतील जोशी यांच्याविषयी तक्रार मांडली गेली नाही.   

Story img Loader