तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी मुलाच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. “उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मातील भेदभावावर मत व्यक्त केलं आहे. त्यांना कोणत्याही धर्माला अथवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता,” असं मत एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या लोकांनी उदयनिधी यांच्याविरोधात खोटा प्रचार केल्याचाही आरोप स्टॅलिन यांनी केला.
एम. के. स्टॅलिन म्हणाले, “उदयनिधी यांनी सनातन धर्मात दलित, आदिवासी आणि महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावावर मत व्यक्त केलं. त्यांचा कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता. उदयनिधी यांनी सनातन धर्मातील शोषण करणाऱ्या या गोष्टींवर बोलणं भाजपा समर्थकांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी उदयनिधी यांनी सनातनी लोकांचा नरसंहार केल्याचा खोटा प्रचार केला.”
“भाजपाच्या समर्थकांनी उदयनिधी यांच्याबाबत खोटा प्रचार केला”
“सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थकांनी उदयनिधी यांच्याबाबत खोटा प्रचार केला. याचा देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठा प्रचार करण्यात आला. असं असलं तर उदयनिधी यांनी तमिळमध्ये किंवा इंग्रजीत नरसंहार हा शब्द वापरला नाही. असं असूनही खोट्या दाव्यांचा प्रचार केला जात आहे,” असं मत एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केलं.
“पंतप्रधान मोदींनी उदयनिधींबाबत केलेलं वक्तव्य ऐकून दुःख”
यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदयनिधी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य ऐकून दुःख झालं. मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उदयनिधी यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली.”
“खोटा प्रचार केला जात असल्याचं माहिती असूनही मोदींनी ते वक्तव्य केलं का?”
“खरंतर पंतप्रधान मोदींकडे उदयनिधी यांनी हे वक्तव्य केलं आहे की नाही हे तपासण्याची सर्व संसाधने आहेत. मोदींना उदयनिधी यांच्या विधानाबाबत खोटं पसरवलं जात आहे हे माहिती नाही की खोटा प्रचार केला जात असल्याचं माहिती असूनही त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत हे वक्तव्य केलं का?” असा सवाल स्टॅलिन यांनी विचारला.