पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्यासह काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या हल्ल्यामुळे घाबरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. भाजपाशासित त्रिपुरामध्ये अभिषेक आणि अन्य नेत्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी हा आरोप केला आहे. त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वी या राज्यात तृणमूल काँग्रेसनं पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

“भाजपा त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश आणि जिथे जिथे त्यांचं सरकार आहे तिथे अराजकता पसरवत आहे. आम्ही अभिषेक आणि अन्य पार्टी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहोत. असे हल्ले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्याशिवाय शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या समोर झालेल्या हल्ल्यात त्यांचा हात आहे. त्यामुळेच पोलीस मूग गिळून गप्प बसले आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असे हल्ले करण्याचा दम नाही”, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

टीएमसीचे युवा नेते देबांग्शु भट्टाचार्य, सुदीप राहा आणि जया दत्ता पक्षाच्या कामानिमित्त त्रिपुरात गेले होते. मात्र त्यांच्या गाड्या रस्त्यात अडवून हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अगरतलानंतर धर्मनगर येथे गोळ्या चालवल्या गेल्या आणि एक टीएमसीचं कार्यालय देखील फोडलं, असा आरोप त्यांनी केला. तर मागच्या काही दिवसात अभिषेक बॅनर्जी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दांड्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader