CM Mamata Banerjee Made Tea : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी सोमवारी (२६ जून) जलपायगुडी येथील मालबाजार परिसरातल्या चहाच्या दुकानात चहा बनवला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या हाताने चहा बनवून तिथे जमलेल्या लोकांना दिला. एक प्रकारे त्यांनी चहा देऊन मतदारांचं तोंड गोड केलं आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात केंद्र सरकारने तैनात केलेल्या बीएसएफवर (Border Security Force – सीमा सुरक्षा दल) गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, सीमा सुरक्षा दल हे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचतंय. भाजपावाले बीएसएफच्या माध्यमातून राज्यातील सीमावर्ती भागांमधील मतदारांना घाबरवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पोलिसांना बीएसएफच्या एकंदरीत सर्व कारवायांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

हे ही वाचा >> “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…

पश्चिम बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसने रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मला अशी माहिती मिळाली आहे की सीमा सुरक्षा दलाचे काही अधिकारी सीमावर्ती भागांना भेट देत आहेत, मतदारांना धमकावत आहेत आणि त्यांना मतदान करू नका, असं सांगतं आहेत. परंतु मी लोकांना सांगेन की घाबरू नका आणि निर्भयपणे निवडणुकीत मतदान करा.

Story img Loader