१७ सप्टेंबर २०२३ रोजी कोलकात्यातील शांतिनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यानंतर आता शांतिनिकेतनच्या बाहेर लावलेल्या संगमरवरी फलकावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू (आचार्य) व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपकुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांची नावं असलेला संगमरवरी फलक लावला आहे. या फलकावर रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख नसल्याने वादाला सुरुवात झाली आहे.
संबंधित फलकावर रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजेपर्यंत संबंधित फलक बदलला नाही तर व्यापक निदर्शने केली जातील, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला. तसेच संबंधित फलकावर रवींद्रनाथ टागोर यांचं नाव न लिहिल्याने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर बॅनर्जी यांनी टीका केली.
“रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळेच शांतिनिकेतनला युनेस्कोचा टॅग मिळाला आणि तुम्ही वारसा स्थळाच्या फलकावरून त्यांचंच नाव काढून टाकलं. राज्यात
दुर्गापूजा उत्सव सुरू होता, त्यामुळे आम्ही गप्प होतो. पण उद्या (२७ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही हा फलक काढून नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाचा दुसरा फलक लावला नाही, तर आमचे लोक योग्य ते प्रात्यक्षिक सुरू करतील,” अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी इशारा दिला आहे. त्या कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.